दैनिक स्थैर्य | दि. २१ फेब्रुवारी २०२३ | फलटण | विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली फलटणमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील रामेश्वर चौकातील शुक्रवार पेठ तालीम मंडळ येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न होणार आहे. राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर फलटण तालुक्यात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विविध विकासकामांच्या शुभारंभाचा धडाका लावला आहे. त्यामुळे फलटण शहरामध्ये होणाऱ्या या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मेळाव्याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सन १९९१ पासून फलटण शहरासह तालुल्याची एकहाती सत्ता विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे आहे. फलटण तालुक्यामध्ये सबकुछ श्रीमंत रामराजे अशी परिस्थिती सद्य स्थितीत आहे. अगदी गेल्या काही महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा सर्वाधिक ग्रामपंचायती ह्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडेच आहे. सध्या नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद येथे प्रशासक विराजमान आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतच्या काही याचिका ह्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने नेमक्या केंव्हा निवडणुका होणार आहेत; हे कोणालाही सांगता येणार नाही. परंतु आगामी निवडणुकांच्या दृष्टीनेच आता कार्यकर्ते मेळावे सुरु झाले आहेत.
गेल्या काही महिन्यापासून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विविध योजनांचा शुभारंभ करत फलटण शहरासह तालुक्याची सत्ता आपल्याकडे येण्यासाठी आता कंबर कसली आहे. त्यामुळे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण शहरामध्ये होणाऱ्या मेळाव्याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.