
स्थैर्य, फलटण, दि. २८ सप्टेंबर : “श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आवळा दाखवून पोहळा मिळवण्याच्या मानसिकतेत असून, खासदार गटातील कार्यकर्त्यांमध्ये अविश्वास निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, खासदार गटातील एकही कार्यकर्ता यावर विश्वास ठेवणार नाही. आमची सर्व भिस्त माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरच अवलंबून आहे,” असा घणाघाती हल्ला माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
फलटण तालुक्यात सुरू असलेल्या राजकीय मनोमिलनाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अशोकराव जाधव यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले, “श्रीमंत रामराजे यांचे राजकारण हे कायम विश्वासघातकी राहिले आहे. गरज पडेल तेव्हा तालुक्यातील राजकारण्यांचा वापर करायचा व नंतर त्यांना फेकून द्यायचे, हे सर्व तालुक्याने ओळखले आहे. १९९५ पासून लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर, स्व. हणमंतराव पवार यांचे पुत्र तेजराज पवार, स्व. कृष्णचंद्र भोईटे, प्रल्हादराव साळुंखे-पाटील, स्व. सुभाषराव शिंदे, स्व. चिमणराव कदम यांचे पुत्र सह्याद्री कदम यांच्यासह अगदी अलीकडे श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांचा कसा वापर केला व नंतर कशी वागणूक दिली, हे तालुक्याला माहिती आहे.”
जाधव पुढे म्हणाले, “आज फलटण तालुक्याला एक खंबीर, लढवय्या, एकवचनी व जनतेची खऱ्या अर्थाने काळजी घेणारा नेता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने मिळाला आहे. कार्यकर्त्यांचा विश्वास आहे की, मागील काही अनुभव पाहता, ते कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय असा कोणताही निर्णय घेणार नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही चर्चेवर विश्वास ठेवू नये.”