श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल येथे क्रिकेट अकॅडमीचे उद्या श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते उद्घाटन


दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण आणि क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ चॅम्पियन्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिकेट अ‍ॅकॅडमीचे उद्या, दि. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुल, श्रीमंत रामराजे शॉपिंग सेंटर रविवार पेठ, फलटण येथे विधान परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे माजी रणजी कर्णधार ८८ प्रथम श्रेणी सामने खेळलेले व सध्या महाराष्ट्र संघाचे मार्गदर्शक व १९ वर्षांखालील निवड समितीचे अध्यक्ष मिलिंद गुंजाळ व पुणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त तथा महाराष्ट्राचे माजी क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया हे असणार आहेत.

या कार्यक्रमासाठी आमदार दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य बाबासाहेब गंगवणे व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सदस्य उपस्थित राहाणार आहेत.

या अकॅडमीमध्ये १० वर्षांपासून पुढील विद्यार्थांना सहभाग नोंदवता येईल. या अकॅडमीमध्ये क्रिकेट प्रशिक्षणाबरोबर आहार, जीवनकौशल्ये आणि मानसिक कणखरता यावर विशेष व्याख्याने दिली जातील.

अ‍ॅकॅडमीमध्ये खेळाडूंना सरावासाठी पाच सराव खेळपट्ट्या उपलब्ध केल्या गेल्या आहेत. तसेच व्यायामासाठी सुसज्ज व अत्याधुनिक जीम तसेच स्वतंत्र चेंजिंग रूम उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक, भारतीय संघातील खेळाडू, रणजी संघातील खेळाडू, फिटनेस तज्ञ आणि योगा प्रशिक्षक यांच्याकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे व विविध स्पर्धा आणि सामन्यांमध्ये सहभाग नोंदवला जाणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन केले जाणार आहे.

या क्रिकेट अकॅडमीची सरावासाठीची वेळ सकाळी ७.०० ते ९.०० तर सायंकाळी ४.०० ते ६.०० अशी असणार आहे, अशी माहिती क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ चॅम्पियन्स, पुणे यांच्यामार्फत देण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!