
अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; नितीन गडकरींशी चर्चा करणार असल्याचे रामराजेंचे आश्वासन
स्थैर्य, फलटण, दि. २९ ऑगस्ट : फलटण-दहिवडी रस्त्याच्या कामामुळे बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आज बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.
या बैठकीला प्रशासनातील विविध खात्यांचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी कोळकी, झिरपवाडी, भाडळी बुद्रुक, भाडळी खुर्द, दुधेबावी या गावांमधील शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामामुळे येणाऱ्या अडचणी आणि समस्या सविस्तरपणे मांडल्या. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याचे आणि विषय समजून घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
शेतकऱ्यांच्या समस्यांची तीव्रता लक्षात घेता, याप्रकरणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी चर्चा करणार असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. तसेच, गरज भासल्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.