स्थैर्य, फलटण, दि. 13 : घराण्याचा वारसा जपत, आधुनिकतेची कास धरुन फलटण तालुक्याचा कायापालट करण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे नेतृत्व म्हणजे ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपले आजोबा श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या पावलावर पाउल ठेउन नव्हे तर त्यांच्यापेक्षा एक पाउल पुढे टाकून त्यांनी आजपर्यंतची वाटचाल दमदारपणे केली आहे.
धोम बलकवडीचे जनक
आपले आजोबा श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी नीरा उजव्या कालवा तसेच नीरा-देवघरद्वारे फलटण तालुक्याच्या कायापालट केला. उर्वरित तालुका विकासापासून वंचित राहू नये, यासाठी कृष्णा खोर्यातील पाणी नीरा खोर्यात आणण्याचे स्वप्नवत काम ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पूर्णत्वास आणले आहे.
अवघ्या महाराष्ट्राचे भूषण ठरावे, अशी धोम-बलकवडी धरणाची व त्याच्या कालव्याची योजना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली आहे. या धरणातील पाणी प्रत्यक्ष शेतकर्यांच्या शेतापर्यंत आलेले आहे. या धरणाची कामे सर्व कामे पूर्ण झाली असून पावसाळ्यातच हे धरण पूर्ण क्षमतेने भरत आहे. यामध्ये 4.08 टीएमसी पाणीसाठा करण्यात आला आहे.
औद्योगिक क्रांतीची नवी पहाट
श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी न्यू फलटण आणि श्रीराम सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. तालुक्यातील शेतकर्यांनी फलटणचा भाग व्यापला. बहुतांश शेतकरी शहराकडे आकर्षित झाला. हा इतिहास फलटणमधील आजही अनेक जाणकार विसरु शकत नाहीत.
त्याच अनुषंगाने फलटण-लोणंद एमआयडीसी स्थापन करुन ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर थांबले नाहीत, तर कमिन्ससारखा आंतरराष्ट्रीय प्रकल्प फलटणमध्ये आणून औद्योगिक पर्वाची मुहूर्तमेढ रोवली. आणि आता अतिरिक्त औद्योगिक वसाहत ही फलटणमध्ये साकरण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे प्रयत्न सुरु झालेले आहेत. त्याचप्रमाणे फलटण येथे सुरु असणारा शासकीय आयटीआय कमिन्स या कंपनीने दत्तक घेतला असून कंपनीसाठी आवश्यक असणार्या ट्रेडस येथे शिकवल्या जात आहेत. कमिन्सपाठोपाठ येत्या काही दिवसात फलटण तालुक्याच्या माळावर अनेक कंपन्या सुरु होतील. फलटण तालुक्यातील व शहरातील अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. या सर्वाबरोबर अडचणीत सापडलेला न्यू फलटण शुगर वर्क्स हा कारखान्याला पुन्हा संजीवनी देवुन तालुक्यातील हजारो शेतकर्यांना त्यांचे न्यु फलटणकडे राहिलेले हक्काचे पैसे पुन्हा मिळवुन दिले.
मुधोजी हायस्कूल ते इंजिनियरिंग कॉलेज
श्रीमंत मुधोजीराजे यांनी आपल्या संस्थानातील गरीबातील गरीब विद्यार्थ्याला शिक्षण घेता यावे यासाठी श्रीमंत मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांनी मुधोजी हायस्कूलची स्थापना केली. हाच वारसा जपत श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. हा वारसा श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांनी जोपासला या सोसायटीच्या फलटण तसेच माण तालुक्यातील शाखाविस्तार करुन ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षण मिळण्यासाठी अहोरात्र धडपड केली. सध्या या सोसायटीमार्फत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल, श्रीमंत शिवाजीराजे हॉर्टिकल्चर कॉलेजची स्थापना करुन ते थांबले नाहीत. सध्या भव्य दिव्य असे इंजिनियरिंग कॉलेजही सुरु झालेले आहे. आपल्या भागातील मुलांना शिक्षणाच्या सर्व सुविधा आपल्या येथे उपलब्ध करुन देण्यात राजघराणे कोठेही कमी पडलेले दिसत नाही.
फलटणचे नगराध्यक्ष ते विधानपरिषदेचे सभापती
ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर या तिघांनी तालुक्याच्या राजकारणाला 1991 साली सुरुवात केली. तत्पूर्वीच्या काही कालखंडात तालुक्याचे झालेले नुकसान भरुन काढताना भविष्यकालीन विचार करुन त्यांचे राजकारण सुरु आहे. ना. श्रीमंत रामराजे 1991 साली फलटणचे नगराध्यक्ष झाले. या काळात फलटणसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. यामध्ये जकात बंद, पाणीपुरवठ्यात कोणत्याही प्रकारची वाढ होउ दिली नाही. त्याचप्रमाणे पाणीपुरवठ्याचा पाचवा टप्पा, निरनिराळी शॉपिंग सेंटर्स, भाजी मंडईचे योग्य स्थलांतर या कामांबरोबरच फलटण तालुक्याचा काय पण संपूर्ण महाराष्ट्राला लाजवेल अशी अतिक्रमण पुनर्वसन योजना अस्तित्वात आणण्यातही ते कमी पडले नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रातच काय पण भारतातही जिकडे तिकडे अतिक्रमण पुनर्वसन हा प्रश्न गंभीर होउ लागलेला असतानाही फलटण येथे मात्र ना. श्रीमंत रामराजे यांच्या कल्पकतेतून अतिक्रमण पुनर्वसन योजनेतील गाळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे नगरपरिषदेची वास्तू फलटणच्या वैभवात भर घालणारी झाली आहे. या दोन्ही वास्तूंचे उद्घाटन तत्कालिन केंद्रीय कृषीमंत्री ना. शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ना. शरद पवार यांनीही ना. श्रीमंत रामराजे यांच्या कल्पकतेचे कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील अनेक छोटीमोठी कामे ना. श्रीमंत रामराजे यांनी पूर्णत्वास नेली आहेत.
शरद पवार यांचा विश्वास
हे सर्व करत असताना ना. श्रीमंत रामराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ना. शरद पवार यांचा पूर्ण विश्वास संपादन केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ना. श्रीमंत रामराजे यांनी पवारसाहेबांना साथ दिली आहे. तालुक्याच्या विकासाचा रथ प्रगतीकडे वाटचाल करत असतानाच त्यांनी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये सातारा जिल्ह्यातील अधिकाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळवून देण्यातही ना. श्रीमंत रामराजे मागे पडले नाहीत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी पेलली आहे. स्वत: पदाची अपेक्षा न ठेवता प्रत्येक तालुक्याला समान संधी देण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले आहेत. या सर्व कामांची पावती म्हणूनच की काय ना. शरद पवार यांनी ना. श्रीमंत रामराजे यांना विधानपरिषदेचे सभापती पद बहाल केले आहे. हा अवघ्या सातारा जिल्ह्याचाच बहुमान होता असे म्हणावे लागेल.
राजा/सभापती असल्याचा डामडौल नाही.
ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची अत्यंत उच्चविद्याविभुषित लोकांशी मैत्रीचे नाते आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्याशी बोलताना आपण राजे असल्याचा त्यांना कधीही डामडौल नाही. स्वत:सुद्धा एक राजा, विधानपरिषदेचे सभापती असूनही आपल्याशी इतक्या प्रेमाने, विनयाने वागत असल्याबद्दल त्यांचे कौतुक राज्यातील अनेक जण करित असतात. विधानपरिषदेचे सभापती व फलटणचे अधिपती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना !
– प्रसन्न दिलीप रुद्रभटे,
संपादक, दैनिक स्थैर्य