दैनिक स्थैर्य । दि. 7 आक्टोंबर 2024 । फलटण । राज्यामध्ये अचानक श्रीमंत रामराजे पक्ष बदलणार असल्याच्या बातम्या सुरु झाल्या होत्या त्यावर अनेकांनी मला फोन करुन विचारले परंतू अद्याप मी पवार साहेबांना भेटलो नसून जर पवार साहेबांच्याबरोबर जायच झालच तर अजितदादांच्या साक्षीनेच मी पवार साहेबांच्या बरोबर जाईन; तालुक्यातील कार्यकर्ते हे तुतारीसाठी आग्रही आहेत. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे संपूर्ण गोष्टी मांडणार असून येणार्या विधानसभा निवडणूकीसाठी दिपक चव्हाण हेच आपले उमेद्वार असल्याची घोषणा विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
खटकेवस्ती येथे आयोजित कार्यक्रमात श्रीमंत रामराजे बोलत होते यावेळी आ. दिपक चव्हाण, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष बापूराव गावडे यांच्यासह राजेगटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
तर दोघ समोरा समोर अपक्ष लढू
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भारतीय जनतापार्टी मध्ये आहेत भारतीय जनता पार्टीला आमचा काही एक विरोध नाही; परंतू स्थानिक पातळीवर रणजितसिंह हे टोकाचे राजकारण करीत असून त्यांना आमचा कायम विरोध आहे. जर त्यांच्यात हिंमत असेल तर दोघांनी पक्षाची झालर बाजुला ठेवून समोरासमोर अपक्ष निवडणूक लढवू नक्की बघू तर काय होतय ? असा खोचक सवाल श्रीमंत रामराजे यांनी उपस्थित केला.
जिल्ह्यातील एक आमदार सोडला तर इतर कोणाशीच वैर नाही
जिल्ह्यामध्ये व राज्यामध्ये राजकारण करित असताना आपल्या जिल्ह्यातील एक आमदार सोडला तर इतर कोणाशीही माझे वैर नाही; अगदी भारतीय जनता पार्टीमधील देवेंद्र फडणवीस इतर वरिष्ठ नेत्यांसोबत माझे अतिशय चांगले संबंध आहेत. परंतू जिल्ह्यातील या आमदारा सोबत व या आमदाराच्या नादी लागलेल्या माजी खासदारासोबत आपले कधीही जुळणार नाही! असे मत यावेळी श्रीमंत रामराजे यांनी व्यक्त केले.
कार्यकर्ता हाच आमचा केंद्रबिंदू; कार्यकर्त्यांना डावलून निर्णय नाही
पूर्वीच्या काळामध्ये आम्ही राजकारणात आलो तेंव्हा नेत्यांनी घेतलेले निर्णय हे कार्यकर्ते अंमलात आणत होते. परंतू आता कार्यकर्त्यांना होणार्या प्रशासनाच्या त्रासामुळे कार्यकर्त्यांचा भावना अतिशय तीव्र झालेल्या आहेत. कार्यकर्त्यांना डावलून कोणताही निर्णय आम्ही घेवू शकत नाही. भारतीय जनता पार्टी हा आमचा शत्रू नाही. पंतप्रधान नरेंद्र मोही व गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसला जे जमले नाही असे निर्णय सुध्दा घेतलेले आहेत व त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत श्रीमंत रामराजे यांनी व्यक्त केले.
कार्यकर्त्यांची कामे होत नसतील तर सत्ता काय कामाची?
राज्यामध्ये गतवर्षी झालेल्या घडामोडीमध्ये शरद पवारांना सोडून जाताना मला काय वेदना झाल्या असतील हे कुणीही सांगू शकत नाही. परंतू त्यावेळी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जे प्रशासनाकडे त्रास होत होते ते होवू नयेत म्हणून आजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. परंतू सत्तेमध्ये जावून सुध्दा कार्यकर्त्यांची कामे मार्गी लागू शकली नसल्याने अशी सत्ता काय कामाची ? असा सवाल सुध्दा श्रीमंत रामराजे यांनी उपस्थित केला.
शरद पवारांच्या केंद्रातील ताकदीमुळे तालुक्यातील पाण्याचे प्रश्न मार्गी
केंद्रामध्ये पवार साहेब मंत्री असताना त्यांनी फलटण तालुक्यातील पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच झुकते माप आपल्याला दिलेले आहे. हे कधीही फलटण तालुका विसरु शकणार नाही. पवार साहेबांच्या केंद्रातील ताकदीमुळेच फलटण तालुक्यातील पाण्याचे प्रश्न मार्गी लागले असल्याची कबुली यावेळी श्रीमंत रामराजे यांनी दिली.
माण मधून फोन गेल्याने अमित शहांनी जिल्हा बँकेचा कार्यक्रम टाळला
नुकत्याच काही दिवसापूर्वी जिल्हा बँकेचा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी बँकेचे अध्यक्ष तथा खासदार नितीनकाका पाटील यांनी स्वत: केंद्रीय सहकार मंत्री अमितभाई शहा यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते व त्यांनी कार्यक्रमाला येण्याचे कबुल सुध्दा केले होते. परंतू त्यांना माण तालुक्यातून फोन गेल्याने त्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यक्रमाला येणे टाळले असल्याचे मत श्रीमंत रामराजे यांनी व्यक्त केले.
नीरा-देवघरचे पाणी सांगोल्याला देण्याचा माजी खासदारांचा डाव
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून निरा-देवघर धरण पूर्ण झाले आहे. परंतू कालव्याची कामे रखडली आहेत. त्या धरणामधील जे पाणी फलटण तालुका सध्या वापरत आहे ते पाणी सांगोला तालुक्याला देण्याचा डाव माजी खासदारांचा आहे याबाबत त्यांनी निर्णय सुध्दा करुन घेतला होता तो आपल्या सर्वांना हाणुन पाडायचा आहे असे मत आ. दिपक चव्हाण यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील सर्व बदल्या माजी खासदारांच्या शिफारशीने
अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आपण महायुतीमध्ये गेल्यानंतर स्थानिक पातळीवरील प्रशासनामध्ये होणार्या बदल्या या स्थानिक आमदारांच्या शिफारशीने होणे आवश्यक होते. परंतू आपल्या तालुक्यामधील सर्व प्रशासकीय बदल्या या तत्कालीन खासदार व आत्ताचे माजी खासदारांच्या माध्यमातून होत असल्याने आपण महायुतीमध्ये आहे की नाही हे सुध्दा समजत नसल्याचे मत आ. दिपक चव्हाण यांनी व्यक्त केले.
दोन दिवसात कार्यकर्ता मेळावा घेणार
लोकसभा निवडणूकीमध्ये श्रीमंत रामराजे यांनी पक्षश्रेष्ठींना सांगून महायुतीच्या उमेद्वाराचा प्रचार केला नव्हता राजेगटाच्या असणार्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचा प्रचार केला असून आता विधानसभा निवडणूकीमध्ये सुध्दा कार्यकर्त्यांचा तीव्र भावना आहेत. येणार्या दोन चार दिवसामध्ये प्रमुख कार्यकत्यांचा मेळावा बोलवुन त्यांच्या भावना जाणून घेण्याचे काम श्रीमंत रामराजे करतील असे मत यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ. बाळासाहेब शेंडे, बजरंग खटके, मनोज गावडे, ऋतुराज नलवडे, डॉ. शिवाजी गावडे, शंकर माडकर, सुभाष धुमाळ, बापूराव गावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाण्याची एकमुखी मागणी श्रीमंत रामराजे यांच्याकडे केली.