दैनिक स्थैर्य । दि. ०२ जुलै २०२२ । फलटण । नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारची बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक यासाठी ३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन होणार आहे. ३ जुलै रोजी पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून कुलाब्याचे तरुण आमदार व विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नार्वेकर यांच्या निवडीनंतर विधान भवनात आता विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची जोडी बघायला मिळणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे १०६ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे ५० आमदार यामुळे नार्वेकरांचा विजय हा पक्काच मानला जात आहे. राहुल नार्वेकर हे सध्या केवळ ४५ वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष असतील. शिवाय ते निष्णात वकील देखील मानले जातात.
या सोबतच नार्वेकर विजयी झाल्यास सासरे विधानपरिषदेचे सभापती अन् जावई विधानसभेचे अध्यक्ष असे चित्र निर्माण होणार आहे. नार्वेकर हे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. नार्वेकरांचे बंधू अॅड. मकरंद नार्वेकर हे कुलाब्यातूनच भाजपचे नगरसेवक होते.