श्रीमंत रामराजे – उदयनराजेंच्या विश्रामगृहावर दिलखुलास गप्पा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.१: सातारा जिल्हयाच्या राजकारणात एकमेकांतून विस्तवही जाणार्‍या खासदार उदयनराजे भोसले व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शनिवारी चक्क एकमेकांना नमस्कार करत मनमोकळ्या गप्पा मारल्या. हा दुर्मिळ योग सातार्‍याच्या शासकीय विश्रामगृहात सायंकाळी साडेसहा वाजता जुळून आला. ना. रामराजे उदयनराजे यांच्या भेटीतून काय राजकीय गणिते आहेत की सहज भेट की आणखी काही याची खमंग चर्चा मात्र सुरू झाली आहेे. 

लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व उदयनराजे यांच्यात झालेल्या जोरदार राजकीय शेरेबाजीमुळे चांगलेच वितुष्ट आले होते. ना. रामराजेंनी खा. उदयनराजेंवर जबरदस्त हल्ला चढवल्यामुळे या टीकेला जोरदार उत्तर देण्यासाठी उदयनराजे यांनी फलटण गाठले होते. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या पावसाच्या सभेतही रामराजे यांनी उदयनराजे यांच्यावर कडवी टीका केली होती. त्यामुळे दोन राजघराण्यातील विसंवादाची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती. काही वेळा दोन्ही राजे सातार्‍यातील विश्रामगृहातच आमनेसामने आले होते तेव्हा तो राजकीय ताणं सांभाळताना पोलिसांची प्रचंड कसरत झाली होती. 

शनिवारी संध्याकाळी खासदार उदयनराजे भोसले सायंकाळी सव्वासहाच्या दरम्यान एका बैठकीच्या निमित्ताने शासकीय विश्रामगृहात पोहचले. तेव्हा तेथील कक्ष क्रमांक एकमध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आधीपासूनच उपस्थित होते. रामराजे यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच उदयनराजे यांनी त्यांच्या दालनात जाऊन रामराजेंना थेट नमस्कार केला. रामराजेंनी सुध्दा प्रतिसाद देत उदयनराजे यांना नमस्कार दिला. विसंवाद बाजूला ठेवत दोन्ही राजांनी दिलखुलास गप्पा मारल्या. राजकारणात कधीच कोणी कायमस्वरूपी शत्रू नसतो, मतभेद हे तत्कालिक असतात, हेच उभयतांच्या भेटीवरून स्पष्ट झाले. दोन्ही राजेंची भेट योगायोगाने झाली त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ एकमेकांनी एकमेकांच्या तब्ब्येतीची चौकशी करून काळजी घ्या असे सांगितल्याचे दोन्ही राजेंच्या स्नेही मंडळींनी सांगितले. रामराजे उदयनराजे यांच्या अनौपचारिक भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. राजकीय पंडितांनी सुद्धा आश्‍चर्य व्यक्त केले. कितीही विसंवाद झाला तरी राजशिष्टाचाराचे संकेत दोन्ही राजेंनी मात्र आवर्जून पाळल्याचे दिसून आले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!