दैनिक स्थैर्य | दि. ७ जुलै २०२३ | मुंबई |
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजितदादा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा गट शिंदे-भाजपासोबत सत्तेत सामिल झाला. अजितदादा उपमुख्यमंत्री होऊन राष्ट्रवादी अन्य आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथही घेतली आहे. त्यातच आता उपुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सामिल झाले आहेत. त्यामुळे २०१५ पासून २०२२ पर्यंत असे सलग सात वर्ष विधान परिषदेचे सभापतीपद भूषविणारे श्रीमंत रामराजे यांना या नवीन निर्माण झालेल्या राजकीय समीकरणाने पुन्हा विधान परिषदेचे सभापतीपद मिळणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री झालेल्या अजितदादा पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाल्यामुळे एक अनुभवी माजी सभापती म्हणून श्रीमंत रामराजे सध्या चर्चेत आहेत. त्यांची पुन्हा विधान परिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागावी म्हणून अजितदादा यांचा गट प्रयत्नशील राहील, याची शक्यता आहे. त्याबरोबरच श्रीमंत रामराजे हे स्वतःही सभापतीपदासाठी पुन्हा इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
राज्याच्या नवीन समीकरणामुळे श्रीमंत रामराजे पुन्हा विधान परिषदेचे सभापती झाले तर राज्याच्या विधीमंडळात पुन्हा सासरे विधान परिषदेचे सभापती, तर जावई विधानसभा अध्यक्ष होऊन राज्याच्या राजकारणात दुर्मिळ योग पाहण्यास मिळेल, अशी राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे.
राज्याच्या विधान परिषद पक्षीय सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे : भाजप : २२, राष्ट्रवादी काँग्रेस एकूण – ९ : अजित पवार गट- ५ तर शरद पवार गट -४, काँग्रेस : ८, शिवसेना : ११ : ठाकरे गट- ९ : शिंदे गट – २, रिक्त जागा – २१ व इतर जागा – अपक्ष.