दैनिक स्थैर्य | दि. 14 ऑक्टोबर 2024 | फलटण | कोल्हापूर येथील खर्डेकर जहागीरदार घराण्यातील कणखर व्यक्तिमत्व, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन उद्योगपती श्रीमंत राजसिंहराजे आप्पासाहेब निंबाळकर उर्फ बंटीराजे खर्डेकर यांचे शनिवारी पुणे येथे रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. आज (रविवार) सकाळी फरांदवाडी ता. फलटण येथील त्यांच्या श्री साईराजा फ्रूट पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुपुत्र श्रीमंत दिप्तीमानराजे खर्डेकर यांनी अग्निसंस्कार केले. उपस्थितांनी त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.
यावेळी त्यांचे जावई आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सुकन्या श्रीमंत सौ. वेदांतिकाराजे भोसले, माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीश्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा बँक संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, श्रीमंत धीरेंद्रराजे खर्डेकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, मनोज घोरपडे, संग्राम घोरपडे, डॉ. विजयराव बोरावके, प्रल्हादराव साळुंखे पाटील,दिलीपसिंह भोसले, विश्वासराव निंबाळकर, डॉ. सचिन सुर्यवंशी बेडके, चेतन शिंदे, सह्याद्री चिमणराव कदम, रविंद्र बेडकिहाळ वगैरेंनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
त्यांचे पार्थिव शनिवारी राञी उशीरा फलटण येथील भवानी हाऊस या निवासस्थानी आणण्यात आले. आज सकाळ पासून आसू सह तालुक्यातील नागरिकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी भवानी हाऊस, फलटण येथे गर्दी केली होती. सकाळी १० वाजता सजविलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीतून त्यांच्या पार्थिवाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभा राहून शहरातील नागरिकांनी अंत्यदर्शन घेतले. दुपारी १२ वाजता फरांदवाडी ता. फलटण येथील श्री साईराजा फ्रूट पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांचे पश्चात्त पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. फलटण, सातारा, कोल्हापूर येथील नातेवाईक आणि राजकीय, सामाजिक शैक्षणिक, कृषी, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर यांनी श्रीमंत बंटीराजे खर्डेकर यांचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली.
श्रीमंत बंटीराजे खर्डेकर यांनी फलटण प्रमाणे कोल्हापूर येथे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. शिरोळ पंचायत समितीमध्ये ते निवडून आले होते. फलटण मध्ये पहिला कृषी प्रक्रिया उद्योग श्रीमंत बंटीराजे खर्डेकर यांनी उभारला. एक यशस्वी उद्योजक म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जात होते. उद्योग क्षेत्रात तरुणांना प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्त्व होते. संघर्षाला न भिणारे, अत्यंत निर्भीड व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून गेले आहे. त्यांच्या निधनाने उद्योग, कृषी, सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर : श्रीमंत बंटीराजे खर्डेकर हे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व होते. फलटणच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली. तसेच श्रीराम कारखान्याचे व्हा. चेअरमन म्हणून काम पाहत असताना त्यांनी कारखान्यासाठी मोठे योगदान दिले आहे. पटत नसेल तर स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. तेवढाच भक्तिभाव जपणारे आणि दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून ते सर्व परिचित होते असे व्यक्तिमत्त्व आज हरपले आहे. परमेश्वराने त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ति द्यावी. तालुक्यातील शेतकरी, उद्योजक आणि कामगारांच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
श्रीमंत बंटीराजे खर्डेकर यांचा परिचय…..
-
कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य १९७३ ते १९७८
-
उपसभापती, पंचायत समिती शिरोळ जि. कोल्हापूर.
-
श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण व्हा. चेअरमन १९७८ ते १९९०.
-
संस्थापक अध्यक्ष जायट्स ग्रुप ऑफ फलटण.
हनुमंतवाडी, ता. फलटण येथे ५ लाख रुपये देणगी देऊन श्रीमंत बाबाराजे खर्डेकर हायस्कूल इमारत बांधून दिली
सातारा शहरातील शाहू ॲकॅडमी शिक्षण संस्थेत श्रीमंत प्रशांतिनीराजे यांचे नावे १० लाख रुपये खर्चून प्राथमिक शाळा इमारत बांधून दिली. आसू ता. फलटण येथे १२ लाख रुपये खर्च करुन श्री काळेश्वर देवस्थानचा जीर्णोद्धार केला. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स सातारा यांचा उद्योग भूषण, महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन पुणे यांचा उद्योग रत्न, बेंगलोर येथे आयसीएसइओ केरळा यांचा मदर टेरेसा एक्सलन्स नॅशनल अवॉर्ड त्यांना देवून सन्मानित करण्यात आले होते.