फलटण: श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शनाला विक्रमी प्रतिसाद; दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांची भेट


फलटण येथील श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शनाचा समारोप उत्साहात संपन्न झाला. या प्रदर्शनाला १ लाख ५७ हजार शेतकऱ्यांनी भेट देऊन विक्रमी प्रतिसाद नोंदवला. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सेंद्रिय शेती आणि तरुणांनी कृषी व्यवसायात येण्याचे आवाहन केले.

स्थैर्य, फलटण, दि. ३१ डिसेंबर : फलटण एज्युकेशन सोसायटी आणि कृषी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५’चा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला. पाच दिवसांत फलटण व परिसरातील तब्बल १ लाख ५७ हजार शेतकरी, महिला आणि युवकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शना करताना सेंद्रिय व नैसर्गिक शेती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

युवा शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा

समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “युवा शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीत अडकून न राहता कृषीपूरक व्यवसायांमध्ये सक्रिय होणे गरजेचे आहे. कृषी क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ऊस शेतीला प्रोत्साहन देतानाच भाजीपाला, सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीला प्राधान्य देऊन कृषी उत्पन्न वाढवले पाहिजे.” यावेळी त्यांनी कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एस. कांबळे उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले आणि आयोजन समितीचे कौतुक केले.

जमिनीचे आरोग्य आणि ‘कॅन्सर ट्रेन’

यावेळी आयोजित चर्चासत्रात कृषीभूषण अंकुश पडोळे यांनी जमिनीच्या ढासळत्या आरोग्यावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा व औषधांचा अतिरेक केल्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होत आहे. पंजाबमधून राजस्थानला जाणारी ‘कॅन्सर ट्रेन’ हे त्याचेच भयानक उदाहरण आहे. भविष्यातील पिढीला सुपीक जमीन द्यायची असेल, तर आताच जागे होऊन सेंद्रिय कर्ब वाढवणे आणि विषमुक्त अन्न पिकवणे गरजेचे आहे.” बदलत्या जीवनशैलीमुळे नैसर्गिक आहाराकडे वळण्याचे आवाहनही त्यांनी केले.

विक्रमी गर्दी आणि सन्मान

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी प्रास्ताविकात प्रदर्शनाच्या यशाचा आढावा घेतला. ते म्हणाले की, शेती यांत्रिकीकरण आणि नवीन तंत्रज्ञान पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. यानंतर प्रदर्शनात सहभागी झालेल्या उत्कृष्ट स्टॉलधारकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एस. एस. कांबळे उपस्थित होते. याप्रसंगी गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, नितीन गांधी, रणजित निंबाळकर, दूध संघाचे धनंजय पवार, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, ह.भ.प. प्रतीक महाराज भोसले, मुकुंद धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षा चौगुले व सृष्टी झाडोकर यांनी केले, तर डॉ. ए. पी. रणवरे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!