श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 : शेतकऱ्यांसाठी भरड धान्याचे महत्व

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०५ जानेवारी २०२५ | फलटण | श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण द्वारा आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 च्या अंतर्गत आयोजित चर्चासत्रामध्ये कृषी विज्ञान केंद्र, कालवडेच्या गृह विज्ञान विभागाच्या डॉ. प्रियदर्शनी देशमुख यांनी उपस्थित शेतकऱ्यांना भरड धान्य हे आरोग्यासाठी पौष्टिक व लाभदायी असल्याचे मार्गदर्शन केले.

हे प्रदर्शन २ जानेवारी ते ६ जानेवारी २०२५ पर्यंत चालू राहणार आहे व या चर्चासत्रासाठी अध्यक्षस्थानी श्री. रामदास कदम, सदस्य, मे. गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण हे उपस्थित होते. डॉ. प्रियदर्शनी देशमुख यांनी मिलेट्स म्हणजे भरडधान्य हा संपूर्ण पोषक आहार आहे असे सांगितले. “भरडधान्य गटात ज्वारी, बाजरी, राळे, वरई, नाचणी, राजगिरा, डेंगळी आदी तृणधान्ये मोडतात. भरडधान्यात ग्लुटेन नसल्याने त्यातून शरीराला उत्तम पोषण मिळू शकते,” असे त्या म्हणाल्या.

भरडधान्यांतील विविध पोषणमूल्यांमुळे मधुमेह, रक्तक्षय रोखण्यासाठीही मदत होऊ शकते, असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले. त्यांनी नमूद केले की भरडधान्याला भारतात ‘श्रीअन्न’सुद्धा म्हंटले जाते, ज्यामुळे त्याचे महत्व अधिकच वाढते.

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयातील माजी विद्यार्थी व प्रयोगशील शेतकरी पुरस्कार प्राप्त श्री. प्रतिक भोसले यांनी भारतीय शेती संस्कृती व बदलत्या शेतीचे पंचसुत्रे, आधुनिक शेती तंत्रज्ञान, दुष्काळातील प्रगतशील शेती तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना श्री. रामदास कदम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती व अधिकतम शेती उत्पादन, बदलती पिक पद्धती व तंत्रज्ञान आधारित शेती प्रणाली या विषयावर मार्गदर्शन केले.

या चर्चासत्रासाठी श्री. शरदराव रणवरे, व्हॉईस चेअरमन, महाविद्यालयीन समिती, डॉ. नागेश गावडे, विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, कालवडे, श्री. एकनाथ गोडखे, प्रगतशील शेतकरी, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, शेतकरी वर्ग उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी दिक्षा चौगुले या विद्यार्थिनीने केले.

श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 मध्ये आयोजित चर्चासत्रांद्वारे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, आरोग्यदायी आहार व आधुनिक शेती पद्धतींबद्दल मूलभूत मार्गदर्शन दिले जाणे हे शेती क्षेत्रातील प्रगतीचे प्रतीक आहे. या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी व आरोग्यदायी आहाराचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.


Back to top button
Don`t copy text!