
स्थैर्य, फलटण, दि. 24 ऑक्टोबर : दिवाळी सणाच्या निमित्ताने फलटण शहरातील श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाने उभारलेली प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती आणि अफजलखान वधाचा देखावा हा शिवकालीन इतिहासाला उजाळा देणारा एक प्रेरणादायी उपक्रम आहे, असे प्रतिपादन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले. या प्रतिकृतीसोबत किल्ल्याविषयी ऐतिहासिक माहिती देणारे फलक लावल्याने हा उपक्रम अधिक उद्बोधक ठरला असल्याचेही ते म्हणाले.
श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या या उपक्रमाचे उद्घाटन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि फीत कापून करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, फलटण तालुका मराठा क्रांती मोर्चा समन्वयक ज्ञानेश्वर (माऊली) सावंत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले, उद्योजक मंगेश दोशी, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजाभाऊ निकम, राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष ताजुद्दीन बागवान, शहराध्यक्ष अल्ताफ पठाण, मुंबई उच्च न्यायालयातील वकील विश्वनाथ टाळकुटे, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूलचे विशाल पवार, पत्रकार युवराज पवार, प्रशांत रणवरे, योगेश गंगतीरे आदी मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत कल्पकतेने आणि मेहनतीने प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. किल्ल्यावरील तत्कालीन वास्तूंची उभारणी करताना त्याचे ऐतिहासिक महत्त्व जपण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, या प्रतिकृतीच्या शेजारील दालनात किल्ल्याचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि अफजलखान वधासारख्या महत्त्वपूर्ण घटनांची माहिती चित्ररूप आणि लिखित स्वरूपात मांडण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रदर्शन पाहिल्यानंतर शिवरायांचा पराक्रम आणि तत्कालीन काळ जणू डोळ्यासमोर उभा राहतो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे निमंत्रक अमीरभाई शेख यांनी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी मंडळाच्या माध्यमातून वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली. आजची नवी पिढी मोबाईलच्या विश्वात गुरफटली जात असताना, त्यांना आपल्या गौरवशाली इतिहासाची, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि इतर महापुरुषांच्या कार्याची ओळख व्हावी, त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी किल्ले संवर्धक संघटनेच्या प्रतिनिधींनी उभारण्यात आलेल्या प्रतापगड प्रतिकृतीबद्दल आणि माहिती फलकांबद्दल सविस्तर माहिती दिली.
या उद्घाटन सोहळ्यासाठी लायन्स क्लब, रोटरी क्लब या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, बिल्डर्स असोसिएशन व क्रेडाईचे पदाधिकारी, माळजाई कट्टा ग्रुपचे सदस्य उत्तम महामुलकर, राजाभाऊ देशमाने, मोहन जामदार, राहुल शहा, योगेश दोशी, बंडूशेठ कदम, शरद दीक्षित, बारवबाग मित्र मंडळाचे सदस्य बळीप सर बंधू, संदीप कर्णे, आशिष जाधव, सचिन माने, मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

