
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या वतीने आयोजित ३९ व्या ‘पालखी पादुका परिक्रमा’ सोहळ्याचे आज (दि. ९ मार्च) सायंकाळी ५ वाजता फलटणमध्ये आगमन होत आहे. मलठण येथून भव्य मिरवणूक निघणार असून, अहिल्यानगर येथील मंदिरात पालखीचा मुक्काम असेल.
स्थैर्य, फलटण, दि. ९ मार्च : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या वतीने आयोजित ‘पालखी पादुका परिक्रमा’ सोहळ्याचे आज, सोमवार दि. ९ मार्च रोजी फलटण नगरीत मोठ्या भक्तीमय वातावरणात व उत्साहात आगमन होत आहे. या परिक्रमेचे हे ३९ वे वर्ष असून, स्वामी भक्तांमध्ये पादुका दर्शनासाठी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे, अशी माहिती श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे प्रमुख संजय चोरमले यांनी दिली आहे.
सायंकाळी ५ वाजता मलठण येथून निघणार भव्य मिरवणूक
मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी ५:०० वाजता श्री स्वामी समर्थ मंदिर, मलठण येथे पालखीचे आगमन होईल. याठिकाणी पालखीचे जंगी स्वागत करून भव्य मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक श्री स्वामी समर्थ मंदिर (मलठण) येथून निघून श्री हरिवुवा मंदिर, पाचबत्ती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, उमाजी नाईक चौक, गजानन चौक, शंकर मार्केट आणि श्रीराम मंदिर या प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ होईल.
अहिल्यानगर येथील मंदिरात मुक्काम व पादुका दर्शन
शहरातून मार्गक्रमण केल्यानंतर या मिरवणुकीचा समारोप अहिल्यानगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात होणार आहे. पालखीचा रात्रीचा मुक्काम श्री स्वामी समर्थ मंदिर (अहिल्यानगर, गजानन चौक, फलटण) येथे असणार आहे. या काळात भाविकांना अत्यंत जवळून स्वामींच्या पादुका दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
तरी फलटण शहर व परिसरातील सर्व स्वामी भक्तांनी या अभूतपूर्व सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व आशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
