स्थैर्य, अकलूज, दि. ३० : श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागासह माण तालुक्याचा विकास झालेला आहे. मधल्या काही काळामध्ये काही चुकांमुळे कारखाना बंद झालेला होता. परंतु माजी खासदार विजयसिंह मोहिते – पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या सभासदांनी मोठ्या विश्वासाने हा कारखाना आमच्या हाती दिलेला आहे. सभासदांच्या त्याच विश्वासाच्या जोरावर आम्ही कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन देवू, असा विश्वास श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील यांनी व्यक्त केला.
सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची ५३ वी अधिमंडळाची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे चेअरमन व विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील म्हणाले की, १० डिसेंबर २०१८ ला सभासदांनी या कारखान्याची सुत्रे आमच्या हातात दिली. त्याचवेळी कारखाना सुरु करण्याचा शब्द आम्ही सभासदांना दिला व त्याच विश्वासाने सन २०२० – २१ चा गळीत हंगाम आम्ही सुरु केला. काही तांत्रिक अडचणीमुळे केवळ १६ हजार २६७ मे. टन उसाचे गाळप करता आले. तरीही आपण सहकार महर्षी कारखान्याप्रमाणे पहिला हप्ता १९०० रुपये प्रमाणे दिला. पुढील वर्षासाठी सुमारे ४ हजार १९० एकर उसाची नोंद झाली आहे. कारखान्याने पुढील वर्षी ५ लाख मे टन उस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि ते आपण उस उत्पादक व सभासद यांच्या विश्वासावर पुर्ण करु असे सांगून कारखान्यासमोर अडचणी आहेत. त्या वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आपण दूर करु. उस उत्पादक व कामगार यांचा एक पैसाही आम्ही बुडविणार नाही. सर्वांनी संचालक मंडळाला साथ द्यावी असे ही आवाहन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी या वेळी केले.
प्रारंभी कारखान्याचे सभासद बलभीम पाटील व रमेश जगताप यांच्या हस्ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते – पाटील, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते – पाटील व स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते – पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. संचालक सुरेश पाटील यांनी ह्या काळात निधन झालेल्या सभासद, कामगार, संचालक व मान्यवरांना श्रध्दांजली अर्पण केली. कारखान्याचे व्हाईस चेअरमन ॲड. मिलींद कुलकर्णी यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक रविराज जगताप यांनी विषय वाचन केले. सभासदांनी सर्व विषयांना ऑनलाईन मंजूरी दिली.
या सर्वसाधारण सभेस राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील, संचालक बाबाराजे देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते – पाटील यांच्यासह संचालक व अधिकारी उपस्थित होते. आभार संचालक सुनील माने यांनी आभार मानले.