नामदेव महाराज पालखी सोहळ्याचे फलटणमध्ये उत्साहात स्वागत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १३ नोव्हेंबर २०२४ | फलटण | पंढरपूर वरून पंजाब राज्यातील घुमान येथे जाणाऱ्या श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात व फलटण तालुक्यात उत्साहात स्वागत शिंपी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी फलटण शहर नामदेव समाज परिषदेचे अध्यक्ष करण भांबुरे, श्री विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेश हेंद्रे, उपाध्यक्ष मृणाल पोरे, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पद्मा टाळकुटे, महेश हेंद्रे, विजय उंडाळे, मोहन जामदार, अविनाश कुमठेकर, श्रीकांत मुळे, चंद्रशेखर हेंद्रे, राजेंद्र गाठे, सौ. अंजली कुमठेकर, सौ. अश्विनी हेंद्रे, संजय जामदार, मनीष जामदार, श्रीकांत राजेंद्र पोरे, मंगेश पोरे, राहुल जामदार, योगेश भांबुरे, राजेंद्र कुमठेकर, मिलिंद गाठे, महेश उरणे, यशराज सुभाष भांबुरे यांच्यासह समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे चरण पादुका रथ व सायकल वारी आल्यानंतर सोहळा प्रमुख सूर्यकांत भिसे यांचे व भजनकरी बांधवांचे फलटण शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत संत नामदेव महिला मंडळाच्या वतीने विठ्ठल विठ्ठल विठ्ठला! या तालावर महिलांनी “पाऊली” या नृत्याचा आविष्कार सादर केला. पालखी सोहळा व सायकल वारीची मिरवणूक छत्रपती शिवाजी चौक, बारामती चौक विठ्ठल मंदिर येथे आल्यानंतर करण भांबुरे यांनी डोक्यावर संत नामदेवांच्या पादुका घेतल्या यावेळी महिलांनी ओवाळून व पुष्पवृष्टी करीत स्वागत केल्या नंतर संत नामदेव महाराज यांच्या पादुकांची पूजा करून महाआरती ट्रस्टचे अध्यक्ष राजेश हेंद्रे यांचे हस्ते करण्यात आले.

सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी वारकरी संप्रदायातील भक्त, शिंपी समाज बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. 13 रोजी पहाटे महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पद्मा टाळकुटे यांचे हस्ते महाआरती केल्यानंतर पालखी सोहळा व सायकल वारी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली आहे.

शांती , समता व बंधूता या संत विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतुने भागवत धर्माचे प्रचारक संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची ७५४ वी जयंती, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा ७२८ वा संजीवन समाधीदिन सोहळा व शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानकदेव यांच्या ५५५ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) अशी सुमारे २,३०० किलोमीटरची रथ व सायकल यात्रेचा मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले . या सायकल यात्रेत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सुमारे १०० सायकल यात्रींनी सहभाग नोंदविला आहे.


Back to top button
Don`t copy text!