दैनिक स्थैर्य । दि. २८ फेब्रुवारी २०२२ । औरंगाबाद । समाजाच्या जडणघडणीला संत-महात्मे दिशा देत असतात. श्री समर्थ रामदास स्वामी यांची शिकवण अखिल विश्वाला मार्गदर्शक ठरणारी आहे. त्यादृष्टीने चांगले आयुष्य जगण्यासाठी सर्वांनी समर्थांची शिकवण आचरणात आणावी, असे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे सांगितले.
तापडिया नाट्यमंदिरात आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त एकदिवसीय श्री समर्थ साहित्य संमेलनात राज्यपाल बोलत होते. मंचावर यावेळी संत साहित्य शिक्षण व संशोधन प्रतिष्ठान औरंगाबाद, श्री समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट औरंगाबाद, श्री समर्थ वाग्देवता मंदिर धुळे, श्री समर्थ मंदिर संस्थान जांब, श्री गणेश सभा, श्री एकनाथ संशोधन मंदिर या संयोजक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आपला समाज आणि राष्ट्र बलशाली होण्यासाठी संत विचारांचा प्रवाहीपणा आवश्यक असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले, आपल्या देशात समृध्द गुरूपरंपरा चालत आलेली आहे. मानवी जीवनामध्ये सदगुरू लाभणे ही मोठी उपलब्धी आहे. संत साहित्यातून हे सर्वार्थाने साध्य होते. महान विभूतींना संत साहित्याने नेहमीच मार्गदर्शन केलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मराठी भाषा गौरव दिनी श्री समर्थ साहित्य संमेलनाचे आयोजन एक स्त्युत्य उपक्रम असल्याचे सांगून श्री.कोश्यारी यांनी मध्ययुगीन कालखंडात महाराष्ट्रातील समाजमन घडविण्यात समर्थांची शिकवणूक महत्वपूर्ण राहिलेली आहे. ज्ञानेश्वरांपासून मराठी भाषेला संत साहित्याची उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे. त्यामध्ये समर्थ रामदासांच्या साहित्याचे स्थान महत्वाचे आहे. समर्थांनी, “प्रभाते मनी राम चिंतीत जावा”, “मना सज्जना भक्ती पंथेची जावे”, “जनी निंदते ते सोडूनी द्यावे” या आणि यासारख्या एकापेक्षा एक सरस रचनेतून मानवी जीवनात सदाचाराचे असलेले महत्व वारंवार अधोरेखीत केलेले आहे. त्यांची सर्व संत वचने आजच्या काळात प्राधान्याने आचरणात आणण्याची गरज असल्याचे श्री.कोश्यारी यावेळी म्हणाले.
या संमेलनात समर्थांच्या साहित्याबद्दल करण्यात आलेल्या चिंतनातून प्रत्येकाने एक नवीन चेतना घेऊन आपले पुढील आयुष्य सदाचाराने जगण्याचे स्मरण ठेवणे हे या संमेलनाची यशस्वीता ठरेल, असे सांगून श्री.कोश्यारी यांनी समर्थांचे साहित्य हे व्यापक अर्थाने संपूर्ण जगाला दिशा देणारे आहे. आजच्या काळात जगाला या संत शिकवणूकीची अधिक गरज आहे. त्याचे मनन करुन त्यानुसार प्रत्यक्ष आचरण केल्याने आपण खऱ्या अर्थाने नवीन आदर्श पिढी घडवू शकू, असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत काशीकर यांनी केले. यावेळी चंद्रकांत अमृतकर तसेच संमेलन संयोजक संस्थांचाही राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.