
स्थैर्य, फलटण, दि. 2 ऑक्टोबर : श्री सद्गुरू हरीबाबा महाराज यांच्या १८५ व्या प्रगट दिनानिमित्त तीन दिवसीय रथोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा गुरुवार, दि. २ ऑक्टोबर ते शनिवार, दि. ४ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होणार आहे.
महोत्सवाची सुरुवात गुरुवारी सायंकाळी ६ वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते श्रींच्या रथाचे पूजन करून होईल. त्यानंतर भजन व भारुड सेवा सादर होईल. शुक्रवारी, दि. ३ रोजी दिवसभर महाअभिषेक, श्रीहरी चरित्र वाचन, विविध भजनी मंडळांची भजन सेवा, धारेश्वर महाराज यांचे प्रवचन तसेच कुमारी रामेश्वरी जामदार यांचे जलतरंग वादन व शास्त्रीय गायन असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
शनिवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी महोत्सवाचा मुख्य दिवस आहे. सकाळी महाअभिषेकानंतर १० वाजून १० मिनिटांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रथाच्या नगर प्रदक्षिणेस प्रारंभ होईल. हा रथ मलठणमार्गे शहराच्या प्रमुख मार्गांवरून फिरून सायंकाळी ७ वाजता मंदिरात परत येईल. त्यानंतर आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या रथोत्सव सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्ट, रथोत्सव समिती आणि विविध भजनी मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे.