फलटणची श्रीरामयात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न; ‘रथोत्सव’ नसल्याने ‘लॅन्डरोव्हर’मधून नगरप्रदक्षिणा पूर्ण


दैनिक स्थैर्य । दि. ०५ डिसेंबर २०२१ । फलटण । संस्थान काळापासून सुरू असलेली येथील ऐतिहासिक प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रा भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. कोरोनाबाबतच्या निर्बंधांमुळे यावर्षी रथयात्रेला परवानगी देण्यात आली नव्हती. परंतु प्रथेप्रमाणे करण्यात येणार्या धार्मिक विधींना परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार नाईक निंबाळकर देवस्थाने ट्रस्टच्यावतीने प्रभु श्रीरामांचे विधीवत पुजन करण्यात आले. रथोत्सवानिमित्त होणार्‍या नगरप्रदक्षिणेला खंड पडू नये, म्हणून पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्‍वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत ‘लॅन्डरोव्हर’ गाडीमधुन प्रभु श्रीरामांच्या पादुकांची नगरप्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली.

यावर्षीही फलटणसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत परंपरागत पद्धतीने मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली. नाईक-निंबाळकर राजघराण्यातील श्रीमंत सगुणामाता आईसाहेब यांनी सुमारे 250 वर्षांपूर्वी रथयात्रेची सुरू केलेली परंपरा आजही परंपरागत पद्धतीने सुरू आहे. दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला म्हणजे देवदिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीरामाची सजविलेल्या रथातून नगर प्रदक्षिणा होते. शनिवारी व रविवारी सकाळी जिल्हा परिषदेचे सदस्य व नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते रथाचे विधिवत पूजन झाले. त्यानंतर प्रभू श्रीराम, सीता मातेच्या मूर्ती रथामध्ये ठेवून त्यांची विधिवत पूजा व आरती करण्यात आली.

फळे, फुले, पाने आणि विविधरंगी निशाणे लावून उसाच्या मोळ्या बांधून सजविलेला हा रथ नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ होत असतो परंतु कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे यावर्षी रथयात्रा रद्द करण्यात आली आहे. या वर्षी पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्‍वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी ‘लॅन्डरोव्हर’ या गाडीमधुन श्रीराम मंदिरापासून श्रीरामांच्या पादूका नगर प्रदक्षिणेसाठी नेल्या. तद्नंतर शिंपी गल्लीतून बारामती चौकामार्गे नगरपरिषद कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामधुन ज्ञानेश्‍वर मंदिर, गोविंद महाराज उपळेकर मंदिर, डेक्कन चौक, महात्मा फुले चौक, मारवाड पेठ मार्गाने बारस्कर चौक, रंगारी महादेव मंदिरापासून बाणगंगा नदीपात्र, मलटण भागातील सद्गुरू हरिबुवा मंदिरापासून फिरत गजानन चौक या मार्गाने पुन्हा श्रीराम मंदिरासमोरील रथखान्याच्या जवळ नगर प्रदक्षिणेचा समारोप झाला.

यावेळी श्रीमंत जयश्रीमालादेवी नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी प्रभू श्रीरामाचे व रथाचे विधीवत पुजन केले.

प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यासह राजघराण्यातील मानकरी व भाविकांनी दिवसभर प्रभु श्रीरामाचे भक्तीभावाने दर्शन घेतले.


Back to top button
Don`t copy text!