श्रीरामनवमी उत्सवाचा जिल्ह्यात प्रारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 31 मार्च 2025। सातारा । दरवर्षीप्रमाणेे परमपूज्य जगद्गुरु श्री शृंगेरी शारदा पिठाचे प्रमुख शंकराचार्य श्रीमद भारतीतीर्थ महास्वामी आणि श्री विधुशेखरभारती महास्वामी या दोघांच्या प्रेरणा व आशीर्वादाने सातारा येथील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळा येथे गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान नऊ दिवस श्रीराम महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 30 मार्च ते रविवार रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 दरम्यान हा महायज्ञ संपन्न होतआहे अशी माहिती या महायज्ञाचे संयोजक वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांनी दिली.

या रामयज्ञ सोहळ्यात गुढीपाडव्याला सकाळी आठ वाजता ब्रह्म ध्वजारोहण म्हणजेच गुढी उभारून शांतिसुक्त पठण, श्रीराम महायज्ञ प्रधान संकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध, आचार्य वरण, स्थलशुद्धीसाठी उदकशांत, श्रीराम पंचायतना सहित पिठस्त देवतांचे आवाहन पूजन, अग्नि मंथन, अग्नी स्थापना, नवग्रह यज्ञ व पुरुष सूक्त हवन होऊन श्री रामनामाचे हवन केले.

या यज्ञ कुंडामध्ये तांदळाच्या लाह्या अर्थात जाळी तूप काळे तीळ असे अन्न अर्पण केले जाते वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांचे समावेश वेदमूर्ती तपन शास्त्री नातू ,वेदमूर्ती संतोष शास्त्री अभ्यंकर ,वेदमूर्ती विश्वजीत गोडबोले ,वेदमूर्ती प्रकाश शास्त्री करंदीकर यांचे सह विविध मान्यवर ब्रह्मवृंद या यज्ञ सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

यावर्षी श्रीकृष्ण यजुर्वेद पाठ शाळेत प्रयागराज येथे संपन्न झालेल्या महा कुंभमेळ्याचे औचित्य साधून श्रीराम महायज्ञ स्थळावर महा कुंभाचा भव्य देखावा उभारला आहे. शंकराच्या जटेतून वाहणारी गंगा नदी आणि तिच्या किनार्‍यावर आनंदाने सहभागी झालेले महाकुंभमेळ्यातील नागरिक तसेच धनुरधारी रामाची भव्य मूर्ती यावर्षी या यज्ञ स्थळाचे विशेष आकर्षण आहे. यज्ञस्थळाच्या प्रांगणात काढलेल्या भव्य विविधरंगी रांगोळ्या तसेच नयन मनोहर असे आकाश कंदील लक्ष वेधून घेणारे आहेत या श्रीराम महायज्ञ स्थळी विविध देवदेवतांचे पीठ स्थापन करण्यात आले असून त्याला पार्श्वभूमी म्हणून अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील बाल श्रीराम ची भव्य मूर्तीचा कट आउट फ्लेक्स लक्ष वेधून घेणारा आहे.

वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले म्हणाले की, सलग नऊ दिवस चालणार्‍या या श्रीराम महायज्ञ सोहळ्याला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. यावर्षी तब्बल 25 ब्रह्मवृंद सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, उगार या परिसरातून पाठशाळेत दाखल झाले आहेत. सर्वजण सकाळी हवन कुंडामध्ये विविध देवदेवतांच्या प्रित्यर्थ दररोज सुमारे तीन तासाचे हवनविधीत पार पडणार आहेत. यज्ञस्थळी दररोज प्रवचन कीर्तन महिलांचे सामुदायिक भजन महाआरती असे कार्यक्रम होणार आहे. श्रीराम नवमीला दुपारी जन्म काळाचे किर्तन झाल्यावर सायंकाळी पाच ते आठ या वेळेत भव्य शोभायात्राही काढली जाणार आहे. या श्रीराम यज्ञ सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

दरम्यान, सातारा येथील श्री काळाराम मंदिरातही श्रीराम नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. सर्व विश्वस्तांच्यावतीने या उत्सव काळामध्ये दररोज रामनवमीपर्यंत सकाळी पाच ते साडेपाच या वेळेत काकड आरती सकाळी साडेपाच वाजता श्रीरामाला अभिषेक, सकाळी आठ ते साडेआठ श्रीरामाची आरती, दुपारी बारा वाजता महानैवेद्य, दुपारी चार वाजता विविध भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी सहा ते सात या वेळेत अध्यात्म रामायण वेदमूर्ती श्री चंद्रशेखरशास्त्री जोशी हे निरूपण करणार आहेत. दररोज रात्री साडेनऊ वाजता राम मंदिरात महाआरती आयोजित केली आहे .उत्सव काळामध्ये मंगळवार दि.1 एप्रिल रोजी संस्कार भारती आयोजित गीत रामायण हा सायंकाळी सात वाजता कार्यक्रम संपन्न होणार असून बुधवार दि. 2 एप्रिल रोजी सौ .प्रज्ञा लाटकर व सह कलाकारांचा भावभक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. गुरुवार दि. 3 एप्रिल रोजी सौ. अपर्णा मताधिक व रामभक्त रामरक्षा पठण करणार आहेत. शुक्रवार दि. 4 एप्रिल रोजी सायंकाळी चार ते आठ या वेळेत तज्ञ डॉक्टरांकडून नेत्र शिबिर आयोजित केले असून यामध्ये मोफत डोळे तपासणी व अल्प दरात चष्मे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि. 5 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता अयोध्या फाउंडेशन महिला मंचच्यावतीने श्रीराम रथ शोभायात्रा आयोजित केली असून रात्री दहा ते अकरा दरम्यान श्री माहेश्वरी युवक मंडळ सातारा प्रस्तुत भजनांजली हा कार्यक्रम होणार आहे. रविवार दि. 6 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत रोहित बुवा वाळिंबे यांचे जन्म काळाचे कीर्तन श्रीराम जन्मसोहळा संपन्न होऊन रात्री दहा वाजता करपूर महा आरती होणार आहे. सोमवार दि. 7 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता रामनवमीनिमित्त ललिताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने रवींद्र शहा यांनी दिली.

दरम्यान सातारा येथील प्रतापगंज पेठेतील श्रीगोरा राम मंदिर, शनिवार पेठेतील श्री माटे राम मंदिर, समर्थ मंदिर परिसरातील श्री दामले राम मंदिर तसेच संगम माहूली येथील श्रीराम मंदिर आणि शाहूपुरी गेंडा माळ येथील पाटील परिवाराच्या शांत राम अर्थात राम ध्यान मंदिरातही नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थान व श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने समाधी मंदिरातील श्रीराम पंचायतन मूर्ती आणि मंडळाच्या राम भक्त निवास मध्ये असलेल्या श्रीराम पंचायतन मूर्तींपुढे विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजित करण्यात आयोजन करण्यात आले आहे.

श्री क्षेत्र गोंदवले बुद्रुक येथे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या समाधी मंदिर परिसरात तसेच गावातील श्री थोरले राम मंदिर व धाकटे राम मंदिरातही रामनवरात्रात चा मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला . फलटण येथील नाईक निंबाळकर राजघराण्याच्या श्रीराम मंदिरातही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वावरहिरे येथील श्री हनुमंत महाराज मंदिरातही राम नवरात्रात निमित्त भजन, कीर्तन, प्रवचन, मंत्रजागर असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

वेचले येथील श्री देशपांडे यांच्या श्रीराम मंदिरातही विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. नागठाणे येथील श्रीराम मंदिरातही विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!