
दैनिक स्थैर्य । 27 मार्च 2025। सातारा । परमपूज्य जगद्गुरु श्री शृंगेरी शारदा पिठाचे प्रमुख शंकराचार्य श्रीमद भारतीतीर्थ महास्वामी आणि श्री विधूशेखर भारती महास्वामी या दोघांच्या प्रेरणा व आशीर्वादाने येथील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळा येथे गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान नऊ दिवस श्रीराम महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. 30 मार्च ते रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 दरम्यान हा महायज्ञ संपन्न होणार असल्याची माहिती या महायज्ञाचे संयोजक वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांनी दिली.
या रामयज्ञ सोहळ्यात गुढीपाडव्याला सकाळी आठ वाजता ब्रह्म ध्वजारोहण म्हणजेच गुढी उभारून शांतिसुक्त पठण, श्रीराम महायज्ञ प्रधान संकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध, आचार्य वरण, स्थलशुद्धीसाठी उदकशांत, श्रीराम पंचायतना सहित पिठस्त देवतांचे आवाहन पूजन, अग्नि मंथन, अग्नी स्थापना, नवग्रह यज्ञ व पुरुष सूक्त हवन होऊन श्री रामनामाचे हवन केले जाणार आहे.
कार्यक्रमात रविवार दिनांक 30 मार्च रोजी दुपारी पाच ते साडे सहा या वेळेत चव्हाण व सह कलाकारांचे भजन सादर होणार आहे. तसेच शनिवार दि. 5 एप्रिल पर्यंत यज्ञस्थळी दररोज सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळेत विविध स्थानिक भजनी मंडळांचा सामुदायिक भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान रविवार दि.30 मार्च रोजी गुढीपाडव्याला सायंकाळी साडेसहा वाजता नूतन आणि ग्रहयोग या विषयावर चर्चासत्र संपन्न होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांत चैत्रशुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध अष्टमी म्हणजेच 30 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान कार्यक्रम होणार आहे. तसेच चैत्रशुद्ध द्वितीया व तृतीया म्हणजेच सोमवार दि. 31 मार्च रोजी भक्तिरंग हा स्थानिक कलाकारांचा गायनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
यामध्य गायन साथ सौ. विभावरी गोडबोले व सौ. प्राजक्ता भिडे करणारा असून यावेळी तबला साथ मिलिंद देवरे, संवादिनीवर स्वरा किरपेकर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन राजेंद्र आफळे सर करणार आहेत.
मंगळवार दि. 1 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी ह. भ. प. लक्ष्मीप्रसाद पटवारी यांचे कीर्तन होणार आहे. तर बुधवार दि. 2 एप्रिल रोजी ह. भ. प. लक्ष्मीप्रसाद पटवारी यांचेच कीर्तन होणार आहे.
गुरुवार दि.3 एप्रिल 2025 रोजी सौ. दुर्गा कुलकर्णी -गद्रे यांचे एकल व्हायोलिन वादन होणार असून त्यांना साथ सांगत प्रसाद कुलकर्णी करणार आहेत. शुक्रवार दि. 4 व शनिवार दि. पाच रोजी संभाजीनगर येथील ह. भ. प. मनोहरबुआ दीक्षित यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
या कीर्तनासाठी संवादिनीवर साथ दत्तात्रय डोईफोडे व तबला साथ मिलिंद देवरे करणार आहेत. श्रीराम नवमीला रविवार दि. 6 एप्रिल रोजी श्रीराम जन्म काळाचे कीर्तन संभाजीनगर येथील मनोहर बुवा दीक्षित हे करणार आहेत .
श्रीराम नवमीला दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी आठ ते एक या वेळेत शांतिसुक्त पठण आवाहन देवतांचे पूजन अग्नी ध्यान प्रभू श्री रामचंद्राचे प्रित्यर्थ पुरुष सूक्त स्वाहाकार श्रीराम नाम हवन, उत्तरांग हवन बलिदान यज्ञाची पूर्णाहुती श्री राम जन्म काळाचे किर्तन हे करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी यज्ञस्थळापासून शोभायात्रा संपन्न होणार आहे. रामयज्ञ महाकाळात दररोज रात्री नऊ वाजता यज्ञस्थळी महाआरती होणार आहे.
अशी माहिती या महायज्ञाचे निमंत्रक व प्रमुख संयोजक वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांनी दिली. कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी चिमणपुरा पेठ येथील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळा येथे संयोजकांशी संपर्क करावा.