श्री पांडुरंगाची पालखी परतीच्या प्रवासात वारकऱ्यांकडून उत्साहात स्वागत


स्थैर्य, विडणी, दि. ०९ डिसेंबर : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरहून आळंदीपर्यंत गेलेली श्री पांडुरंगाची पालखी परतीच्या प्रवासात विडणी येथे मुक्कामी येताच वारकऱ्यांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले. आळंदीहून परत पंढरपूरकडे जाणाऱ्या या पालखीचा विडणीतील पारंपरिक मुक्काम भाविकांसाठी मोठे आकर्षण मानला जातो.

कार्तिक महिन्यात विठ्ठल–रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांच्या वतीने ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडतो. एकूण २५ ते २७ दिवस चालणाऱ्या या प्रवासात कोरेगाव, काळज, वडजल, फलटण येथील विसाव्यानंतर पालखी विडणी येथील भैरवनाथ मंदिरात एक दिवस मुक्काम करते. राज्यातील विविध जिल्ह्यांतील वारकरी या दिंडीत सहभागी असतात, मात्र परतीच्या प्रवासात संख्या तुलनेने कमी दिसते.

आषाढी वारीप्रमाणेच कार्तिकी महिन्यातील हा सोहळा वारकऱ्यांसाठी पांडुरंग व माऊलींच्या भेटीची परंपरा जपणारा मानला जातो. शतकानुशतके अखंडित सुरू असलेली ही परंपरा विडणीत यंदा सलग ६६व्या वर्षी ‘अभंग’ परिवाराच्या वतीने अन्नदानाने साजरी करण्यात आली. ज्येष्ठ अभंग कुटुंबीयांच्या सांगण्यानुसार ही परंपरा अत्यंत काटेकोर नियोजनात आणि जनसहभागातून टिकून आहे.

विडणीतील मुक्कामादरम्यान भैरवनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सागर अभंग, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. ग्रामपंचायतीने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असून पोलीस प्रशासनाने योग्य बंदोबस्ताची व्यवस्था केली होती.

मुक्कामाची सांगता करून पालखी सोहळा दुसऱ्या दिवशी पहाटे पुढील प्रवासासाठी रवाना झाला.


Back to top button
Don`t copy text!