
सातारा – वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांचा सत्कार करताना चारुदत्त बुवा आफळे, शेजारी डावीकडून प्रशांत तुपे, धनंजय देशमुख, विनायक चिकलगे , सौ. वेदवती गोडबोले, जयंत देशपांडे. (छायाचित्र – अतुल देशपांडे)
स्थैर्य, सातारा, दि. 11 ऑक्टोबर : वेदमूर्ती विवेक शास्त्रींसारखे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व सातार्यात आहे. ही एक संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी गौरवपूर्ण आणि अभिमानाची बाब आहे. आज या वेदमूर्तींचा सत्कार करण्याची संधी मला मंदिर ट्रस्ट ने उपलब्ध करून दिली याबद्दल मी स्वतःला खरोखरच भाग्यवान समजतो. आज राष्ट्रप्रेम उत्पन्न व्हावे यासाठी धार्मिक परंपरेच्या माध्यमातून वेदमूर्ती गोडबोले गुरुजींनी सुरू ठेवलेले कार्य हे खरोखरच कौतुकास पात्र ठरणारे आहे. वेदपाठ शाळेत अध्ययन आणि अध्यापन करत त्यांनी सुरू ठेवलेली ही परंपरा अशीच अखंड पुढे चालत राहो, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.
येथील श्री पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर ट्रस्टच्यावतीने आयोजित केलेल्या सहस्त्रचंडी याग सोहळ्यामध्ये विशेष योगदान व मार्गदर्शन केल्याबद्दल ज्येष्ठ वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांचा नागरी सत्कार मंदिर ट्रस्टच्यावतीने करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रीय कीर्तनकार ह .भ. प .चारुदत्तबुवा आफळे यांच्या शुभहस्ते 51 हजार रुपयांची थैली, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह ,शाल, पुष्पगुच्छ व प्रसाद भेट वस्तू देऊन गोडबोलेशास्त्री यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचा प्रारंभ व्यासपीठावर असलेल्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व दीप प्रज्वलन करून झाला. यावेळी व्यासपीठावर वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले, दिलीप शास्त्री आफळे, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख, विश्वस्त विनायक चिखलगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुकुंदराव आफळे, मंदिर ट्रस्टचे सचिव प्रशांत तुपे, सौ. वेदवती गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवमुर्ती पूजनानंतर सौ. अनुराधा पंडितराव यांनी शिववंदना सादर केले.
वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले म्हणाले, आपल्या मुळाक्षरांना सुद्धा गुप्त शक्ती प्राप्त झाली आहे. देश विदेशात आज आपल्या परंपरेचे मोठे स्वागत होत आहे. या परंपरेत असणारी जबरदस्त ताकद ही परदेशातील लोकांनाही आली आहे. त्यामुळे आज विविध देशातले लोक हे शिकण्याची धडपड करत आहेत. भगवद्गीतेतही अक्षराला महत्त्व देण्यात आलेला आहे. अक्षरांना ब्रह्म म्हटले आहे. ही मूळ गुप्त शक्ती. ही शक्ती जाणूनच दुर्गा मातेचा केलेला हा सहस्त्रचंडी सोहळा खर्या अर्थाने सर्वांना आशीर्वाद देणारा आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करणारा आहे. आज मोठ्या प्रेमाने आपण जो माझा हा सत्कार केला त्याबद्दल मी खरोखरच आपणा सर्वांचा ऋणी आहे.
श्री पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर ट्रस्ट सचिव प्रशांत तुपे म्हणाले, संस्कृतीचा वारसा पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर ट्रस्ट हे जोपासते आणि वाढवते आहे. या ट्रस्टला 25 वर्षांची परंपरा लाभली आहे. ट्रस्टने आगामी काळात दोन नवीन संकल्प सोडले आहेत. यामध्ये गोशाळा उभारणी आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या भव्य शंभू सृष्टी उभारण्याचे काम नव्या वर्षात सुरू केले जाणार असल्याचे सांगितले.
या सोहळ्यासाठी तसेच मंदिराचे उभारणीत गेली 25 वर्षे विशेष योगदान देणार्या पाच आदर्श मातांचा सत्कारही यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यामध्ये श्रीमती कृष्णामाई देशमुख, श्रीमती निर्मला प्रतापराव तुपे, सौ विजया वसंतराव भोसले, श्रीमती इंदुमती रमेश बागडे, श्रीमती कुसुम यशवंत जाधव तसेच आशाताई कुलकर्णी आणि या सोहळ्यास विशेष योगदान देणार्या चिकलगे कुटुंबीयांचा ही विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांचे पंचारतींनी औक्षण करून झाल्यावर सौ.वेदवती गोडबोले यांचाही शाल ,साडी ,चोळी, श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात या सर्व सोहळ्याचे वृत्त संपूर्ण देशभर विविध प्रकारच्या माध्यमातून पोहोचवणार्या पत्रकार अतुल देशपांडे यांचाही वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला .
या सर्व सोहळ्याचे आयोजन नेटकेपणे केल्याबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख यांचा मंदिर ट्रस्टच्या वतीने शिवरायांची भव्य प्रतिमा देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे जयंत देशपांडे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. दिलीप शास्त्री आफळे यांनी मानपत्राचे वाचन केले.
या कार्यक्रम सोहळ्यास वेदमूर्ती विनयशास्त्री गोडबोले, माजी नगराध्यक्ष अशोकराव मोने, ओंकार शास्त्री बोडस, धनंजय शास्त्री कुलकर्णी, वेदमूर्ती विश्वजीत गोडबोले, सौ. विभावरी गोडबोले, सौ. वेदिका गोडबोले, रमेश खत्री, बाळासाहेब चव्हाण, वारकरी संघाचे जिल्हाध्यक्ष बबनराव सापते, विशाल चव्हाण, हरीष शेठ, शिवाजी भोसले, राजू भोसले, विश्वनाथ पुरोहित यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रविवार दि. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत कर्करोग तपासणी तसेच विविध आजारांबाबत आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .