
स्थैर्य, फलटण, दि. २८ ऑगस्ट : गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, विविध गणेशोत्सव मंडळे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत आहेत. आज, श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाने आपल्या ‘श्रीं’च्या मूर्तीचे आगमन पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि मोठ्या जल्लोषात केले.
शहरातील प्रमुख मंडळांपैकी एक असलेल्या श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘श्रीं’च्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढली. ढोल-ताशांच्या गजराने आणि गुलालाच्या उधळणीने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जल्लोष पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या आगमन सोहळ्यावेळी मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. आत्माराम बळीप, श्री. अमीर शेख, श्री. शंकर उर्फ बंडूशेठ कदम, श्री. पियुष बळीप, श्री. हेमंत जगताप यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला होता.