क्षेत्र महाबळेश्‍वर येथील श्री महाबळेश्‍वर व पंचगंगा मंदिर भाविकांसाठी बंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, महाबळेश्वर, दि. 27 : देशात लॉकडाउन जाहीर झाल्यापासून क्षेत्र महाबळेश्‍वर येथील श्री महाबळेश्‍वर व पंचगंगा मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. तरी दर्शनासाठी कोणी आलेच तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तयारी ग्रामपंचायतीने केली आहे. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी भाविकांनी क्षेत्र महाबळेश्‍वर येथे येवू नये, असे आवाहन ग्रामपंचायत व श्री क्षेत्र महाबळेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे. 

कोविड 19 चे संक्रमण लक्षात घेता केंद्र शासनाने देशात मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर केले. या लॉकडाउनमुळे देशातील सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद करण्यात आली. क्षेत्र महाबळेश्‍वर हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी श्री महाबळेश्‍वर हे स्वयंभू शिवमंदिर आहे तसेच पाच नद्यांच्या उगमावर पंचगंगा मंदिर आहे.

दरवर्षी येथे लाखोंच्या संख्येने भाविक येतात व दर्शनाचा लाभ घेतात. श्रावणी सोमवारी कर्नाटक, आंध्र व महाराष्ट्र येथील भाविकांची येथे विशेष गर्दी होत असते. सध्या लॉकडाउन सुरु असून येथील सर्व मंदिरे बंद आहेत. कोणालाही दर्शनासाठी सोडले जात नाही. तरीही काही भाविक चोरून दर्शनासाठी येण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून अशा भाविकांना प्रतिबंध करण्यासाठी ग्रामपंचायतीने गावात प्रवेशबंदी केली आहे. गावाच्या प्रवेशद्वारावर कुंपण घालण्यात आले आहे. तेथे पहारा ठेवण्यात आला आहे, असे असतानाही जर कोणी बेकायदेशीर प्रवेश केला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यामुळे भाविकांनी क्षेत्र महाबळेश्‍वरला येवू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीसह श्री क्षेत्र महाबळेश्‍वर देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने करण्यात आले आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!