
स्थैर्य, सातारा, दि. 17 ऑगस्ट : संततधार पावसातही, ‘भगवान गोपाल कृष्ण की जय’ आणि ‘राधे, राधे’च्या जयघोषात संपूर्ण सातारा जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अनेक मंदिरांमध्ये तिरंगी सजावट करण्यात आल्याने उत्सवाला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली होती.
सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील श्री मुरलीधर मंदिरात दिवशीकर बंधूंच्या वतीने तीन दिवसीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जन्माष्टमीनिमित्त मंदिरातील संगमरवरी मूर्तीला आकर्षक भरजरी पोशाख आणि सुवासिक फुलांनी सजवण्यात आले होते. विशेष म्हणजे, गाभाऱ्यात तिरंगी रंगातील कृत्रिम फुलांची सजावट कृष्ण भक्तांचे लक्ष वेधून घेत होती. रात्री बारा वाजता वेदमूर्ती माधवशास्त्री भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्णाच्या जन्मकथेचे वर्णन करत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंत्र जागर, शाम नाम संकीर्तन आणि कृष्ण पदांचे गायन झाले.
यासोबतच, शहरातील हमदाबाज येथील इस्कॉन मंदिरात, करंजे परिसरातील महानुभाव मठात आणि कृष्णानगर येथील उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील राधाकृष्ण मंदिरातही जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
फलटण तालुक्यातील श्रीक्षेत्र गिरवी येथील देशपांडे परिवाराच्या प्राचीन गोपाल कृष्ण मंदिरातही जन्मोत्सवानिमित्त विष्णुसहस्रनाम आणि गीता पठण करण्यात आले. येथील हरी-हराचे प्रतीक असलेली काळ्या पाषाणातील भव्य कृष्णमूर्ती हे विशेष आकर्षण ठरते. तसेच, माण तालुक्यातील श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या समाधी स्थळावरील श्रीकृष्ण मंदिरातही शेकडो भक्तांच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला.