परिवर्तनवादी विचारांचा दिव्य गाभारा म्हणजेच श्रीगुरु दत्तात्रय महाराज कळंबे : राजेंद्र शेलार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२१ । सातारा । तिथीनुसार आज दि.13 डिसेंबर 2021 रोजी श्रीगुरु दत्तात्रय महाराजांचा विसावा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांचा जागर आणि कार्याचे स्मरण करण्याचा हा अल्पसा प्रयत्न.

ह.भ.प. वै. श्रीगुरु दत्तात्रय महाराज कळंबे यांचे चरित्र एका लेखात बंदिस्त होणारे नाही. त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत आणि त्याचा परिपूर्ण विस्तार केल्याशिवाय महाराजांचे व्यक्तिमत्व साकारणार नाही. तरीही माझा प्रयत्न आहे त्यातील काही दिव्य बिंदू टिपण्याचा, आपल्यापुढे मांडण्याचा. महाराजांच्या  स्मृती जागवताना मला खूप मागे जावे लागेल. तो काळ असा होता की, ग्रामीण महाराष्ट्रात शेती शिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नव्हते, सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगरी भागात तर परिस्थिती खूपच दयनीय होती. गावोगावी शिक्षणाची सोय नव्हती. जिल्ह्याच्या किंवा तालुक्यांच्या ठिकाणी शाळा होत्या मात्र महाविद्यालयीन उच्चशिक्षणासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आपला समाज रुढी, परंपरा आणि अंधश्रद्धेने ग्रासला होता. सर्वप्रकारच्या दारिद्र्यात लोक आपले जीवन जगत होते. नाही म्हणायला एक गोष्ट चांगली घडत होती, ती म्हणजे वारकरी संप्रदायाचे भक्त काही प्रमाणात लोकांना शहाणपण व सुसंस्कृतपणाचे धडे देत होते. भजन, कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून संत वाङमयाचा प्रसार करणारा हा वारकरी संप्रदाय. लिहिता वाचता येत नव्हते तरी शेकडो अभंग तोंडपाठ असलेली अनेक मंडळी या पंथात होती. गावोगावी भजनाच्या मैफिली रंगत असत. त्यातून लोकांचे मनोरंजन होईच परंतू त्याहीपेक्षा सुविचारांचे मार्गदर्शनही समाजाला मिळत असे. एका अर्थाने सुसंस्कृत समाज निर्मितीचे काम वारकरी संप्रदाय करीत होता. हेच त्याकाळी समाज प्रबोधनाचे प्रभावी साधन होते. महाबळेश्वर तालुक्यातील दांडेघर गावच्या दत्तात्रय यशवंत कळंबे नावाच्या युवकाने हे हेरले आणि पुढे याच कामासाठी स्वतःला वाहून घेतले. ज्ञानोबा, तुकोबांवर लोकांची श्रद्धा आहे हे त्याला जाणवले. याच वाटेवरुन वाटचाल करीत आपण समाजाची सर्वांगीण प्रगती साधू शकतो यावर त्याचा ठाम विश्वास बसला. मग आईवडील, घरदार, गाव सोडून या युवकाने वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसारासाठी व त्याव्दारे समाजाचे बौध्दिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपले अवघे जीवन समर्पित केले. त्यासाठी त्याने त्यावेळचे महान समाजसेवक व वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ किर्तनकार संत गाडगे बाबा यांचा आश्रय घेतला. त्यांनाच गुरु केले आणि मग पुढे सुरु झाला दत्तात्रय नावाच्या एका कर्मयोगी तपस्वी साधकाचा समाज परिवर्तनचा अखंड प्रवास. आज सहा – सात दशकांनंतर मागे वळून पाहताना त्यांचे अलौकिक जीवन नजरेसमोर येते पण त्यांनी त्याकाळात केलेल्या त्यागाची, परिश्रमाची व जोपासलेल्या विचारांची महानता आपल्या लक्षात येईलच असे नाही. त्यासाठी आपल्याला त्यांनी जाणीवपूर्वक जगलेल्या खऱ्याखुऱ्या जीवनाचा शोध घ्यायला हवा.

पोटापाण्यासाठी मुंबईला गेलेल्या आपल्या परिसरातील बांधवांना त्यांनी भजनाच्या माध्यमातून संघटित केले. प्रवचन आणि कीर्तनाव्दारे त्यांची बौध्दिक, मानसिक मशागत केली. शिक्षणाचे महत्व पटवून दिले. गावकऱ्यांच्या मुंबईतील राहण्याच्या प्रत्येक सार्वजनिक खोलीवर भजन मंडळ, नाटक मंडळ, गणेश मंडळ स्थापन करुन त्यांच्यात सामाजिक कार्याची आवड निर्माण केली. कष्टाचे व पैशाचे मोल काय असते ते त्यांना पटवून दिले. कष्टकऱ्यांना व त्यांच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्यांच्या संघटना निर्माण केल्या. या कार्यासाठी अनेक तरुण साथीदार निवडले. त्या सहकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करुन वक्तृत्वात, भजन गायनात, आध्यात्मिक विचार मांडण्यात, प्रश्नांची तीव्रता समजून घेण्यात निष्णात बनवले. हळूहळू कष्टकरी वैष्णवांचा मेळा दत्तूबुवांच्या भोवती जमा झाला. दत्तूबुवांनी या सगळ्या मेळ्याला स्वतःचे आदर्श जीवन जगण्याबरोबरच आपल्या गावाच्या विकासाची दिशा दिली. गावोगावी मंदिरे उभारताना शाळाही बांधली पाहिजे याचे महत्व पटवून दिले. हा हा म्हणता आपल्या परिसरात मंदिरांबरोबर विद्यामंदिरांचे जाळे उभे राहिले. गावोगावची मुले शालेय शिक्षणाचे प्राथमिक धडे आपल्या गावातच घेऊ लागली. पुढे दत्तूबुवांनी माध्यमिक शाळा उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची हजारो मुले तेथे शिक्षण घेऊ लागली. समाजाचे शैक्षणिक परिवर्तन घडवून आणण्यात बुवांना मोठे यश मिळाले. माध्यमिक शिक्षण घेऊन मुंबईत आलेल्या शेकडो मुलांना त्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रेरित केले. त्यांना आवश्यक ती मदतही मिळवून दिली. पुढे आपल्या भोवती जमलेल्या लोकांना त्यांनी सहकाराचा मंत्र दिला. सुरवातीला पैसा फंड सुरु झाले. त्यातूनच मग मुंबईसारख्या श्रीमंत उद्योग नगरीत कष्टकऱ्यांच्या मालकीच्या आर्थिक संस्था उभ्या राहू लागल्या. सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, सहकारी मजूर संस्था अशा एक ना दोन; शेकडो संस्थांचे जाळे निर्माण झाले. यामागची खरीखुरी प्रेरणा होती दत्तात्रय कळंबे बुवांची.

कालांतराने लोक कळंबे बुवांना महाराज म्हणू लागले. पुढे ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे म्हणून ते नावारुपाला आले. त्यांच्या कार्याची महती सर्वदूर पसरू लागली. राज्यकर्त्या नेत्यांनी शासन दरबारी त्याची दखल घेतली. कळंबे महाराजांच्या रुपाने श्रमजीवी समाजाला सामाजिक व राजकीय प्रतिष्ठा प्राप्त झाली. महाराजांनी जनतेच्या नानाविध विषयांना, प्रश्नांना हात घातला. धरणग्रस्तांच्या आदर्श पुनर्वसनासाठी लढा उभारला, त्यांना न्याय मिळवून दिला. सांगण्यासारखे असे बरेच काही आहे पण लेखाच्या मर्यादेत त्याची मांडणी फक्त स्पर्श ठरेल. महाराजांचे कर्तृत्व, त्यांचे विचार, भूमिका आणि उपक्रम याबाबत विस्ताराने केंव्हातरी लिहिता येईल. तत्कालीन महाराष्ट्रतले जेष्ठ विचारवंत, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी महाराजांबद्दल गौरवोद्गार काढतांना म्हणाले होते.. ‘दत्तात्रय महाराजांसारख्या सद्गुणी, सज्जनांमुळे बहुजन समाजाला योग्य दिशा मिळत आहे.’ महाराष्ट्रातल्या अनेक विचारवंतांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी महाराजांच्या कार्याचा गौरव केला. महाराष्ट्राचे शिल्पकार व पाहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेब 30 जुलै 1976 रोजी मुंबईतील एका सभेत बोलताना म्हणाले.. ‘ह. भ. प. दत्तात्रेय महाराज कळंबे यांचे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्य पाहिले की, मन भरुन येते. जनतेवर ते मायेच्या जिंव्हाळ्याने प्रेम करतात. आक्रमणे आली गेली परंतू भारतीय विचारधारेचा झरा अखंड वाहात राहिला आहे. दत्तात्रय महाराजांसारखी थोर माणसे याला कारणीभूत आहेत. ही माणसे शांतपणे बसून मार्गदर्शन करीत असतात म्हणूनच हिंदुस्थान राहिला व येथील सामान्य माणूस विकासाच्या वाटेवर आला.’ महाराजांच्या कार्याची यापेक्षा मोठी पोचपावती कोणती असू शकते.!

आज आपला समाज अत्यंत वेगाने प्रगती पथावर जात आहे, आर्थिक संपन्नता मिळवत आहे आणि सर्वच क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटवीत आहे. पण याची पायाभरणी साठ – सत्तर वर्षांपूर्वी कळंबे महाराजांसारख्या अनेक महानुभावांनी केली आहे याचे विस्मरण होता कामा नये. त्यांना साथ दिलेल्या अनेकांनी त्यावेळी आपल्या संसाराचाही फारसा विचार केला नव्हता हे लक्षात घेतले पाहिजे. आज अनेकांचे संसार फुलताना, बहरताना दिसताहेत याचाच विशेष आनंद आपल्याला आहे. कारण महाराजांनी त्याचसाठी अट्टाहास केला होता. मात्र अलीकडे लोक पुन्हा सामाजिक संघटन विसरुन स्वकेंद्रित होताना दिसताहेत, ही समाजासाठी धोक्याची घंटा आहे. नव्या युगातील आव्हाने लक्षात घेऊन शिक्षणाच्या नव्या वाटा शोधल्या पाहिजेत याकडे आपले लक्ष नाही. अध्यात्म हे समाजातील अंधश्रद्धेवर प्रहार करण्यासाठी आणि प्रत्येकाच्या मनात आपुलकी व प्रेम भावना जागृत करण्यासाठी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. एकमेकांचा आदरभाव ठेवला तरच समाज संघटित राहील यासाठी अध्यात्म महत्वाचे आहे. महाराजांनी जाणीवपूर्वक हे आध्यात्मिक विचार समाजात रुजवले होते. मात्र हल्ली वारकरी संप्रदायातील मंडळीही वाट चुकल्यासारखी वाटू लागली आहेत. किर्तनकार-प्रवचनकार अंधश्रद्धेत अडकताना दिसताहेत आणि नेतृत्व करणारे मार्गदर्शक आत्मकेंद्री झाल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत आपल्याला जागरुक व्हावे लागेल. केवळ महाराजांच्या नावाचा जयजयकार करुन आता भागणार नाही. महाराजांचे विचारविश्व समजून घेऊन त्यांची दूरदृष्टी आणि तळमळ लक्षात घेतली पाहिजे. त्यांचा नेमका अट्टाहास जाणून घेतला पाहिजे. त्यांच्या विचारांकडे वरवर पाहून चालणार नाही तर डोळसपणे त्याचे आकलन केले पाहिजे. आज महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे स्मरण करताना प्रत्येकाने आपल्या अंतर्मनात डोकावून पाहण्याची गरज आहे. महाराजांचे वैचारिक बोट सोडून माझा प्रवास सुरु नाही ना ? याचे आत्मचिंतन करण्याचा आजचा दिवस आहे.

मार्गशीर्ष शुध्द दशमी.. आज श्रीगुरु कळंबे महाराजांचा पुण्यस्मरण दिवस. बरोबर वीस वर्षांपूर्वी याच तिथीला महाराजांनी आपला देह ठेवला व वैकुंठ गमन केले. इंग्रजी तारखेनुसार 25 डिसेंबर 2001 हा तो दिवस होता. मात्र भारतीय संत परंपरा, संस्कृती असे सांगते की, पुण्यात्म्याने ज्या तिथीला इहलोकीचा निरोप घेतला त्या दिवशी त्यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करुन मध्यान्ह समयी अक्षदा व फुलांचा वर्षाव करुन स्मृती सोहळा साजरा करावा. मनात त्यांच्या कार्याचे स्मरण व चिंतन करावे, त्यांच्या विचारांचा जागर व्हावा. त्यानुसार आजचा स्मृती दिवस आहे. महाराष्ट्रीय संतांनी वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून मानवतेचे भव्य मंदिर उभारले आहे. महाराजांसारखे अनेक नंदादीप सातत्याने या मंदिराला प्रकाशमान करीत आहेत. काही मंद तेवणाऱ्या लामणदिव्यासारखे संस्कारांची प्रभा उजळवीत आहेत. श्रीगुरु दत्तात्रय महाराज कळंबे यांनी तर आपल्या व्यापक विचारांनी व कर्तृत्वाने या मंदिरात परिवर्तनवादाचा नवा, स्वतंत्र गाभारा निर्माण केला. या गाभाऱ्यात बसून आत्मचिंतन करणे हेच महाराजांचे खरे स्मरण ठरेल व तीच महाराजांना खरी आदरांजली होईल.

– राजेंद्र आनंदराव शेलार

विश्वस्त, ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे सांप्रदायिक मंडळ, आळंदी
सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, टिळक भवन, मुंबई
अध्यक्ष, वसुंधरा विकास संस्था, सातारा
[email protected]
9923406777 / 8999247187


Back to top button
Don`t copy text!