स्थैर्य, 23 फेब्रुवारी, सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून कास पठार परिसरातील घाटवण ता. सातारा येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री घाटाईदेवी तीर्थक्षेत्राला ’ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. याबद्दल घाटाईदेवी देवस्थान ट्रस्ट, परिसरातील ग्रामस्थ आणि भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
घाटवण येथील घाटाईदेवीच्या यात्रेला दरवर्षी हजारो भक्त- भाविक येत असतात. यापूर्वी ’क’ वर्ग असल्याने या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मर्यादा येत होत्या. या तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा मिळावा अशी मागणी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केली होती. घाटाईदेवी तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा मिळावा यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने राज्याच्या ग्रामविकास विभागाने घाटाईदेवी तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा प्रदान केल्याचा निर्णय जाहीर केला आहे.
घाटाईदेवी तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा मिळाल्याने या तीर्थक्षेत्र परिसरातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी, भाविकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भरीव निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे घाटाईदेवी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार मानले आहेत.

