
दैनिक स्थैर्य । दि. २६ जून २०२२ । फलटण । श्री दत्त इंडिया प्रा. लि., साखरवाडी साखर कारखाना यावर्षी सन २०२२/२०२३ च्या गळीत हंगामात १० लाख मे. टन ऊसाचे गाळप करणार असून कारखाना विस्तार वाढीमुळे फलटण तालुक्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वेळेत तुटण्यास मदत होणार असल्याची ग्वाही श्री दत्त इंडिया प्रा. लि. कंपनीचे संचालक जितेंद्र धरु यांनी दिली आहे.
श्री दत्त इंडिया कारखान्याच्या ४ थ्या गळीत हंगामातील मिल रोलर पूजन सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नुकतेच समारंभपूर्वक संपन्न झाले. अध्यक्षस्थानी अ. भा. महानुभाव परिषद आणि श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट फलटणचे अध्यक्ष प. पू. महंत श्यामसुंदर शास्त्री विद्वांस बाबा होते. यावेळी राज्य सहकारी बँकेचे अविनाश महागावकर, कंपनीच्या संचालिका प्रीती रुपारेल, चेतन धरु, प्रशासन अधिकारी अजितराव जगताप, जनरल मॅनेजर सी. टी. साळवे, अर्कशाळा विभागाचे जनरल मॅनेजर राहुल टिळेकर, चीफ इंजिनिअर अजित कदम, शेतकी अधिकारी सदानंद पाटील, इंजिनिअर नितीन रणवरे, किशोर फडतरे, एचआर विराज जोशी, पंचायत समिती माजी सभापती शंकरराव माडकर, महानंद मुंबईचे उपाध्यक्ष डी. के. पवार, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, संजय भोसले, सागर कांबळे, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे राजेंद्र भोसले, राजेंद्र गायकवाड, संतोष भोसले, पोपट भोसले, गोरख भोसले, संजय जाधव, महेश भोसले, आर. बी. भोसले यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
श्री दत्त इंडियाने गतवर्षी ५ लाख २८ हजार मे. टन ऊस गाळप केले असून ऊस उत्पादकांना एफआरपी प्रतिटन २७६१ रुपयांप्रमाणे संपूर्ण पेमेंट केले असून ऊस तोडणी वाहतूक कामगार, वाहतूकदार, कारखान्याचे कामगार वगैरे सर्व घटकांची पेमेंट वेळेवर पूर्ण केल्याचे निदर्शनास आणून देत ऊसाचे वाढते क्षेत्र लक्षात घेऊन कारखान्याची गाळप क्षमता वाढ व अन्य विस्तार मुदतीत पूर्ण करुन यावर्षीच्या हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून संपूर्ण ऊसाचे गाळप वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार कारखाना व्यवस्थापनाने केल्याचे संचालक जितेंद्र धरु यांनी निदर्शनास आणून दिले आहे. प्रशासन अधिकारी अजितराव जगताप यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केले.