स्थैर्य, साखरवाडी, दि. २५ : सध्या फलटण शहरासह संपुर्ण तालुक्यात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत चाललेले आहेत. साखरवाडीत श्री दत्त इंडियाच्या मार्फत कोरोना केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. सध्या फलटणमधील सर्वच कोरोना केअर सेंटर ही पुर्ण भरलेली आहेत. कोरोनाबाधित रूग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी साखरवाडीमध्ये कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात यावे, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी श्री दत्त इंडिया प्रशासनाला दिले. साखरवाडी येथील रूग्णांना कोरोना उपचारासाठी फलटण, लोणंद किंवा बारामतीला जावे लागत होते. परंतू श्री दत्त इंडियाने सुरू केलेल्या कोरोना केअर सेंटरमुळे रूग्णांना साखरवाडीतच उपचार मिळणे आता शक्य झालेले आहे.
साखरवाडी ता. फलटण येथे कोरोनाबाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. साखरवाडी गावठाण व परिसर हा दोन ते तीन वेळा मायक्रो कटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेला होता. हे जाणुनच विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी श्री दत्त इंडिया कंपनीला निर्देश दिले व त्या नुसार श्री दत्त इंडिया कंपनीच्या माध्यमातून साखरवाडी येथे ६५ बेड्सचे कोरोना केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे.
साखरवाडी ता. फलटण येथील श्री दत्त इंडिया कंपनीच्या संपुर्ण मालकीच्या असणार्या न्यू फलटण शुगर वर्क्सचे हॉस्पिटल हे सद्यस्थितीत बंद आहे. आगामी काळामध्ये कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह साखरवाडी पंचक्रोशीतील नागरिकांसाठी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत, अशी माहिती श्री दत्त इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र धारू यांनी या वेळी दिली.
साखरवाडी पंचक्रोशीमध्ये कोरोनाचे रूग्ण हे झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाबाधित रूग्णांना उपचारासाठी फलटण, लोणंद किंवा बारामतीला जावे लागत आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र धारू यांच्या मार्गदर्शनाखाली साखरवाडी येथे श्री दत्त इंडिया कंपनीच्या माध्यमातून कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. येथे उपचार घेणार्या कोरोना बाधित रूग्णांना कंपनीच्या माध्यमातून जेवण व औषध उपचार सुध्दा मोफत करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री दत्त इंडिया कंपनीचे प्रशासकिय व्यवस्थापक अजित जगताप यांनी दिली.