श्री ज्ञानेश्वरांची ओवी ही मराठीरूपी सौभाग्यवतीच

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


अध्याय सहावा : आत्मसंयमयोग 

स्थैर्य, श्री क्षेत्र आळंदी दि . १८ : “माझा मराठीचीये बोलु कौतुके।” ही ओवी प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर राज्य करते. अनेक अलंकार योजनांनी समृद्ध असलेली आपली मराठी भाषा जर ‘सौभाग्यवती’ असेल तर श्री ज्ञानेश्वरांची ही ओवी त्या मराठीरूपी सौभाग्यवतीची ‘मळवट-सौभाग्यलक्षण आहे’ असे मत ह भ प निरंजननाथ महाराज उर्फ स्वप्नील कापसीकर यांनी व्यक्त केले.

आषाढी वारीच्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी , महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ व माय एफएम इंडिया रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरुपणाचे आयोजन करण्यात आले होते . आज ( गुरुवार ) सहाव्या दिवशी ह भ प निरंजननाथ महाराज यांनी आत्मसंयमयोग या सहाव्या अध्यायावर निरूपण केले.

ह भ प निरंजननाथ महाराज म्हणाले , वारकरी सांप्रदायांत पहिल्यांदाच तंत्रज्ञानाची जोड घेवून “तत्वज्ञानाच्या” अधिष्ठानाखाली प्रथमच वारी सोहळ्याच्या या प्रत्येक दिवशी ज्ञानेश्वरीच्या अध्यायची त्यांच्या निरुपणाची संगती देणाचे सुंदर आणि साक्षर कार्य ‘पालखी सोहळा पत्रकार संघाच्या माध्यमातून जगांत प्रथमच होत आहे. हा सुवर्णकंचनयोग समजावा! आजच्याच दिवशी म्हणजे जेष्ठ्य कृ द्वादशी ला विश्वगुरू धर्मसूर्य श्री निवृत्तीनाथ महाराजांचा समाधीसोहळा देखील परमयोगाचे कारण ठरतो.

तैसे गीतार्थाचे सारI जे विवेकसिंधुचे पार। नाना योगविभवभांडार। उघडलें कां॥ सेवेला घेतलेला हा सहावा अध्याय म्हणजे संपूर्ण गीतार्थाचे सार आहे, हे योगाचे वैभव दर्शविणारे भंडार आहे आणि श्रीमाऊलींच्या कृपेने ते आपण अनुभवणार आहोत.

ह्या सहाव्या अध्यायाचा परिचय ‘आत्मसंयोग’ असा शब्दांनी होतो आणि अभ्यास केला असता हा परम गुह्य आणि गुणातीत अश्या ‘अनंत-परमतत्वाचा’ अनुभव करून देतो. याच अध्यायांत श्रीज्ञानेश्वर महाराज ‘भगवंत’ कोण आहे याची व्याख्या सांगतात. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य अशा सहा लक्षणांनी युक्त असलेला भगवंत योग्याच्या रूपाने या सहाव्या अध्यायात आत्मसंयोग प्रकरणांनी कल्याणकारक होतो. अहो ज्ञानालासुद्धा जे प्राप्त होत नाही ते वैभव योगाने सहज प्राप्त होते हे बोलणारा अध्याय!

“माझा मराठीचीये बोलु कौतुके।” ही ओवी प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर राज्य करते. अनेक अलंकार योजनांनी समृद्ध असलेली आपली मराठी भाषा जर ‘सौभाग्यवती’ असेल तर श्री ज्ञानेश्वरांची ही ओवी त्या मराठीरूपी सौभाग्यवतीची ‘मळवट-सौभाग्यलक्षण आहे’ 

अत्यंत साध्या, सोप्या आणि सरळ शब्दांमध्ये अगम्य आणि गहन अश्या योगमार्गाचा षट्चक्रभेदन कुंडलिनी या विषयांचा म्हणजेच राजमार्गाला सुलभ सहज करून देतात. कर्माचा त्याग म्हणजे संन्यास नाही, तर कर्माची आसक्ती समाप्त होऊन कर्म होत राहणे म्हणजे खरा संन्यास आहे असे महाराज स्पष्टपणे सांगतात.

“ऐके संन्यासी तोचि योगी॥“ सन्यासी म्हणजेच निष्कामकर्मयोगी आहे. कर्मयोग हिच भक्तीची प्रथम पायरी आहे. त्याला यम-नियम, प्राणायाम आणि ध्यान यांची जोड द्यावी लागते. जीवाची त्याच्या खर्याच रूपाशी म्हणजेच स्वरूपाशी भेट होणे म्हणजे योग. ज्ञानोबांनी केलेल्या योग्याच्या स्थीतीचे, स्वभावाचे योग्याचे केलेले वर्णन, ज्ञानोबांनी केलेल्या योग्याचे वर्णन हे जीव आणि शिवाच्या ऐक्यावर अधिष्ठित आहे, पतंजलि योग हा अष्टांगयोग आहे. यात अनेक आणि मुख्य फरक आहेत. पतंजलीच्या मार्गावर चालून सांगितलेला हा योग नसून सद्गुरुकृपेने आणि स्व-अनुभवाने सहज साध्य केलेला हा ज्ञानेश्वरांचा नाथ परंपरेचा “सिद्धयोग” आहे.

मनुष्य जीव स्वत: च उद्धार करून घेवू शकतो. आपणच आपले मित्र आणि आपणच आपले शत्रू हे आत्मतत्वाच्या आपल्या जाणिवेवरुन ठरते.  या अध्यायांत अतिशय सुंदर अशी एकांताची व्याख्या पाहायला मिळते.

श्री माऊलींच्या मते ‘एकांत’ म्हणजे भौतिक क्रिया नव्हे. या जगात इतर दुसरं कोणीच नाही, हा भाव संपुष्टात येणं म्हणजे एकांत. सर्वत्र मीच आहे. या जगात आपणच सर्वत्र वसलेला आहे ही धारणा अधिष्ठित झाली की, द्वैतभावाचा निरास होऊन प्राण्यांमध्ये सर्व जीवांमध्ये एकत्व पाहणे अनुभवणे म्हणजे एकांत होय. आपल्या एकटेपणाचा सीमित असलेल्या ‘मी’ चा विलय अखंड विश्वात्मक चेतनेशी म्हणजेच अनंत रूपाने अनुभवणे जिथे मीच सर्वत्र असल्याची भावना एकदा का अंतरंगी ठसली की दुसरे कोणी आहे याचा संबंधच येणार! यालाच श्रीमहाराज ‘पंथराजू’ म्हणतात. म्हणजे भक्तीयोगासाठीचा सर्वश्रेष्ठ मार्ग.

या अध्यायामध्ये श्री माऊली कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी साधकाला मार्गदर्शन करतात. हा योग मार्ग खडतर नसून मनाच्या भौतिक स्थितीमुळे इंद्रियांच्या सलगीमुळे तो कठीण प्रतिपादित होतो. योगासाठीचे स्थान निवडण्यापासून आसन व्यवस्था लावण्यापासून प्राणाचे शोधन करून ध्यानापर्यंत पोहोचणे आणि मग या ध्यानाचा देखील विलय करून परमत्वाशी ऐक्य साधण्याची जी स्थिती आहे जिला समाधी म्हणतात तिला अंगिकारणे.

दुर्लभो विषयत्यागो दुर्लभं तत्वदर्शनम। दुर्लभा सहजावस्था सद्गुरो: करूणांविना ॥ (हठयोगप्रदीपिका-4.9) करोनि सद्गुरू स्मरण यांत सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सद्गुरू स्मरण !

सद्गुरूंचे स्मरण करीत मूळबंध, जालंधरबंध आणि उडीयानबंध यांच्या संयोगाने अपानवायू नाड्या सैल करतो, अंगाचा दाह करतो आणि साधकाला घाबरवतो. अशा वेळी सद्गुरूंचे स्मरणच हे साधकाला सांभाळते.या कुंडलिनी शक्तीचे वर्णन करताना श्रीज्ञानराज म्हणतात,

“नागिणीचे पिले कुमकुमी नहाले” ही कुंडलिनी शक्ति साडेतीन हातांची वेटोळे करून स्वरूपाला विसरल्याने निद्रेत म्हणजेच सुप्तावस्थेत आहे. वज्रासनाच्या चिमट्यामुळै ती जागृत होते आणि जागृत ही झालेली कुंडलिनी शक्ति भूकेने अगदी व्याकूळ होते ती शरीरातील रक्ताचे शोषण करते; पृथ्वी आणि आपतत्व संपवून टाकते आणि मग ती तृप्तीची गरळ ओकते. याच अग्नी तत्वामुळे शरीराचे रक्षण होते. ईडा आणि पिंगला नाड्यांचे एकत्रीकरण होते. षटचक्र भेदले जातात. शांत झालेली ही शक्ति हदय देशात स्थिर होते.

हृदयातून आज्ञाचक्राचा भेद करून आकाश तत्वामध्ये ती विलीन होते. इथे शब्दांची गरजच पडणार नाही. कुंडलिनी शक्ति ह्या शिवाशी ऐक्य साधत ब्रंहरंध्र म्हणजे सहस्त्रारांत स्थिर होते; तिथे शिव आणि शक्तीचे मिलन होते. योगी सिद्ध बनतो.

ते कुंडलिनी जगदंबा।

ही कुंडलिनी शक्ति संपूर्ण विश्वाला धारण करणारी प्रत्यक्ष जगदंबा आहे. इथेच प्रणवाचा (ओंकाराचा) जन्म झाला. हीच जगत् जननी आहे. शिवाची पत्नी शक्ती आहे. संपूर्ण विश्व हिच्याच कारणाने आहे. इथे साधकाला आता अनहद नाद ऐकू येतात आणि मग ते देखील आकाशात विलीन पावतात. आकाश-चिदाकाश आणि मग परमाकाश या सर्वांमधून ही जगदंबा शक्ती चैतन्यरूपाशी एकरूप होते.

“पिंडे पिंडीचा ग्रासू। तो नाथ संकेतीचा दंशू।“

नाथ सांप्रदायाच्या अनन्य योगपद्धतीच्या शिकवणीनुसार भौतिक पिंडदेहाच्या म्हणजेच शरीराच्याच  माध्यमातून परमाकाशातील ब्रह्मरूपी पिंडाचा ग्रास घेण्याची ही शिकवण त्यांना श्रीगुरू निवृत्तीनाथांकडून मिळाली. असा हा ज्ञानदेवांचा योगी-सिद्धसाधक म्हणजे भगवंताचा आत्मा आहे. हा योगी, तपस्वी, ज्ञानी आणि कर्म करणार्यांपेक्षा श्रेष्ठ आहे असे माऊली म्हणतात. मनाच्या चंचल वृत्तीमुळे हा योग मार्ग अत्यंत खडतर प्रतीत होतो पण एरवी सोपे योगासारिखे । काही आहे ॥ या योगमार्गापेक्षा सहज काहीच नाही. रोग्याला बरे करणारं औषध जिभेसाठी मात्र शत्रूच असते त्याप्रमाणे मनाला जागेवर आणणारा योग हा इंद्रियांसाठी शत्रूच असेल. निरंतर अभ्यासाने आणि सद्गुरूकृपेने तो सहज साध्य होतो. हा सगळा योगरूपी संवाद झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनालादेखील योगी होय अतं:करणे पंडुकुमारा II

योगी व्हायला सांगतात. आणि श्री ज्ञानदेवांचा हा योगी

अगा योगी जो म्हणीजे। तो देवांचा देव जाणिज। आणि सुखसर्वस्व माझे। चैतन्य तो॥

तो देवांचा देव तर आहेच. अहो नुसता देव नाही तर तो देवांचे देखील सर्वसुख आहे. परमत्वाचा स्पर्श झालेला श्रीज्ञानदेवांचा योगी चैतन्यमय असून संपूर्ण विश्वाला धारण करणारा भक्तराज आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!