
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने आषाढी वारी पालखी सोहळा २०२६ च्या अनुषंगाने बुधवार, दि. २५ मार्च रोजी पालखी तळांची पाहणी केली जाणार आहे. लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड येथील पालखी तळांच्या पाहणीचा दौरा व वेळ निश्चित करण्यात आली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २४ मार्च : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वेध आतापासूनच वारकऱ्यांना आणि प्रशासनाला लागले आहेत. आगामी ‘आषाढी वारी पालखी सोहळा २०२६’ च्या अनुषंगाने पालखी विसावा आणि मुक्कामाच्या तळांची पाहणी करण्यासाठी ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी’चे विश्वस्त मंडळ उद्या, बुधवार, दि. २५ मार्च २०२६ रोजी पाहणी दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात फलटण तालुक्यातील लोणंद, तरडगाव, फलटण शहर आणि बरड येथील पालखी तळांची पाहणी केली जाणार आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे आणि विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी एका अधिकृत पत्राद्वारे या पाहणी दौऱ्याची माहिती सर्व संबंधित प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि सरपंचांना दिली आहे.
पाहणी दौऱ्याचा मुख्य उद्देश: यंदाच्या वर्षी श्री माऊलींचा पालखी सोहळा दिनांक ०८ जुलै २०२६ रोजी आळंदीतून प्रस्थान ठेवणार आहे. पालखी सोहळा मार्गावरील गावांमध्ये प्रत्यक्ष पालखी तळावर येण्यापूर्वी, तळावरील सोयी-सुविधांची पाहणी करणे आणि तळाबाबत काही अडीअडचणी असल्यास त्यावर चर्चा करून मार्ग काढणे, हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. यासाठी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख, मालक, चोपदार आणि दिंडी समाज उद्या पालखी मार्गावर प्रत्यक्ष भेट देणार आहेत.
फलटण तालुक्यातील पाहणी दौऱ्याचे वेळापत्रक:
पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर माऊलींच्या पालखीचा मुक्काम अनुक्रमे लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड येथे असतो. उद्याच्या (दि. २५ मार्च) पाहणी दौऱ्याचे फलटण व परिसरातील वेळापत्रक खालीलप्रमाणे असणार आहे:
-
लोणंद: दुपारी १२:०० ते १२:३० वा. (लोणंद ग्रामपंचायत/नगरपंचायत)
-
तरडगाव: दुपारी ०१:०० ते ०१:३० वा. (तरडगाव ग्रामपंचायत)
-
फलटण शहर: दुपारी ०२:०० ते ०२:३0 वा. (अध्यक्ष- फलटण नगरपरिषद, प्रांत ऑफिस, तहसीलदार ऑफिस अधिकाऱ्यांसोबत बैठक व भोजन)
-
बरड: दुपारी ०३:३० ते ०४:०० वा. (बरड ग्रामपंचायत)
-
नातेपुते (जि. सोलापूर): दुपारी ०४:३० ते ०५:०० वा.
प्रशासनाला उपस्थित राहण्याचे आवाहन: पालखी तळांच्या या पाहणी दौऱ्यावेळी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि नियोजनावर सविस्तर चर्चा व्हावी, यासाठी संबंधित गावांचे सरपंच, प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी ठरलेल्या वेळेनुसार आपल्या गावात/कार्यालयात उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
उद्या होणाऱ्या या पाहणी दौऱ्यानंतर फलटण शहर आणि तालुक्यातील प्रशासकीय पातळीवर पालखी सोहळ्याच्या तयारीला अधिक वेग येणार आहे.
