
स्थैर्य, 27 जानेवारी, सातारा : येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने अद्यावत शववाहिनीचे प्रजासत्ताक दिनी गांधी मैदान राजवाडा येथे श्री. सुभाष दोशी, श्री. सुधाकर पेंडसे, श्रीमती शिल्पा सातपुते व श्री. राजेंद्र चोरगे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट व लोकसहभागातून 23 वर्षापूर्वी संगम माहुली येथे उभारण्यात आलेल्या कैलास स्मशानभूमीची देखभाल अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात येते. 2 वर्षांपूर्वी याठिकाणी गॅस दाहिणी उभारण्यात आली होती. आतापर्यंत याठिकाणी जवळपास 33,100 (तेहत्तीस हजार शंभर) मृतव्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
सातारा शहरातून मृत व्यक्तीस कैलास स्मशान भूमीत आणण्यासाठी विविध संस्थांच्या 6 ते 7 शववाहिनीचे वाहन उपलब्ध होती. परंतु मागील 1 ते 2 वर्षापासून यातील 4 शववाहिनी वेगवेगळ्या कारणामुळे बंद झाल्या. यामुळे नागरिकांची गैरसोय मोठ्याप्रमाणात होत होती. यामुळे श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने अद्यावत अशी शववाहिनी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी घेतली यासाठी अभिजात इक्वीमेंटस प्रायवेट लि. चे चेअरमन श्री. सुभाष दोशी व सचिन दोशी यांनी ट्रस्टला आर्थिक मदत दिली त्याचप्रमाणे पेंडसे मेटल्सचे श्री. सुधाकर पेंडसे व श्रीमती शिल्पा सातपुते यांनीही बालाजी ट्रस्टला आर्थिक सहकार्य केले.
सुभाष दोशी म्हणाले कि मी मुळचा कोल्हापूरचा परंतु व्यवसायासाठी सातारामध्ये आलो या साताराने मला भरपूर काम व प्रेम दिले आहे आणि म्हणूनच कर्तव्य म्हणून मी शववाहिनी सातारकरांच्या सेवेसाठी श्री बालाजी ट्रस्टच्या माध्यमातून देत आहे.
श्री राजेंद्र चोरगे म्हणाले कि हद्दवाढ व वाढती लोकसंख्यामुळे सातारकर नागरिकांची गैरसोय दूर होण्यासाठी ट्रस्टने शववाहिनी घेण्याचा निर्णय घेतला आहे. शववाहीनीत उउढत, भक्ती संगीतासाठी साउंड सिस्टीम व नातेवाईकांना राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून अत्याधुनिक पद्धतीचे स्ट्रेचर उपलब्ध करून देण्यात आले असून सहज पद्धतीने मृत व्यक्तीस एका व्यक्तीच्या सहाय्याने आत बाहेर करता येऊ शकते. मरण अंतिम सत्य आहे. मृत व्यक्तीचा अंतिम प्रवास सुखकर व्हावा यासाठी हे वाहनाचे ट्रस्टच्यावतीने शववाहिनीचे लोकार्पण करण्यात येत असून कैलास स्मशानभूमी नंतर बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या दुस-या अध्यायाची ही सुरुवात असून हे एक वाहन नसून अद्ययावत स्वर्ग रथ आहे असे मत व्यक्त केले. कराड येथील मॉडर्न टो इंडस्ट्रीज प्रा. ली चे श्री. ओंकार कुंभार व राजेश कुंभार यांनी या शववाहिनीचे इंटरियल डीझाईन अप्रतिम तयार करून वेळेत शववाहिनी उपलब्ध करून दिली.

