दैनिक स्थैर्य | दि. २५ जुलै २०२४ | फलटण |
जैन धर्मियांची दक्षिण काशी असलेल्या धर्मनगरी फलटणमध्ये श्री सिद्धचक्र महामंडल विधान नुकतेच अतिशय आनंदात, धार्मिक वातावरणात श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, नवी पेठ, फलटण येथे संपन्न झाले.
विधानासाठी वात्सल्य सिंधू परमपूज्य आचार्य १०८ श्री सुयश सागर जी महाराज व संघाचे सान्निध्य लाभले. दि. १४ जुलै २०२४ रोजी ध्वजारोहण, दीपप्रज्ज्वलन व अभिषेकाने विधानास सुरुवात करण्यात आली. दि. १४ जुलै ते २१ जुलैअखेर विधान संपन्न झाले.
विधान कालात सकाळी साडेसहापासून श्री १००८ चंद्रप्रभू भगवंतांना अभिषेक करून विधानास सुरुवात करण्यात येत होती. सायंकाळी साडेसात वाजता संगीत आरती व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधान काळात नांदणी मठाचे जगद्गुरु श्री जीनसेन स्वामी भट्टारक यांचे प्रवचन संपन्न झाले. विधानाचार्य म्हणून वडूज येथील युवा पंडित श्री दिनेश उपाध्ये यांनी उत्कृष्ट असे विधान संपन्न केले. संगीतकार म्हणून अकिवाट येथील श्री विद्यासागर बडबडे यांनी उत्तम कार्य केले.
दि. २२ जुलै २०२४ रोजी होम हवन होऊन सिध्दचक्र विधानाची सांगता झाली. श्री सिद्धचक्र महामंडल विधान संपन्न होण्यासाठी श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरचे सर्व विश्वस्त, सन्मती महिला मंडळ, श्री चंद्रप्रभू युवक मंडळ व सकल जैन समाज, फलटण यांचे योगदान लाभले.
विधानाकरिता फलटणनगरीतील तसेच सोलापूर, नीरा, बारामती, इंदापूर, पुणे-मुंबई येथील श्रावक – श्राविका यांनी श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, नवी पेठ, फलटण येथे बहुसंख्येने उपस्थिती लावली होती.
श्री सिद्धचक्र महामंडल विधानाच्या आयोजनाबद्दल उपस्थित सर्व श्रावक-श्राविका यांनी विश्वस्तांना धन्यवाद दिले.