
श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट राजघराण्याला प्रदान केलेल्या पावन पादुकांचे दर्शन प्रथमच फलटणमध्ये होत आहे. मंगळवारी (दि. ९) श्रीराम मंदिरात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०९ डिसेंबर : फलटणमधील स्वामी भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अक्कलकोट राजघराण्याच्या परंपरेतील आणि साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रदान केलेल्या पवित्र, दिव्य पादुकांचे दर्शन प्रथमच फलटणकरांना घडणार आहे. श्रीमंत नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंगळवारी (दि. ९) श्रीराम मंदिर, फलटण येथे ‘पावन पादुका दर्शन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवसभर दर्शनाची सोय
या आध्यात्मिक सोहळ्यासाठी मंगळवारी, दि. ०९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०९ ते रात्री ०९ वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे. फलटणमधील श्रीराम मंदिरात या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. या पादुका अत्यंत चमत्कारिक आणि पवित्र मानल्या जातात, त्यामुळे भाविकांना ही एक मोठी पर्वणी असणार आहे.
भाविकांना उपस्थितीचे आवाहन
श्री स्वामी समर्थांची दिव्य उपस्थिती अनुभवण्यासाठी आणि या पावन पादुकांचे दर्शन घेण्यासाठी फलटण व परिसरातील सर्व भक्तांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक ‘श्रीमंत नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट, फलटण’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

