दैनिक स्थैर्य | दि. 29 डिसेंबर 2024 | फलटण | फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे असणाऱ्या श्री दत्त इंडिया साखर कारखान्याने गेल्या काही दिवसांमध्ये एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे, ज्यामुळे त्यांच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना आनंद होणार आहे. ११ डिसेंबर २०२४ रोजी, कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी जाहीर केले की गाळीत हंगाम २०२४/२५ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाला पहिली उचल म्हणून रुपये ३१०० प्रति टन दर देण्यात येईल.
श्री दत्त इंडिया साखर कारखान्याचा ऊसाचा एफआरपी (फेयर अँड रिम्युनरेटिव प्राइस) नुसार दर हा २६५० रुपये प्रति टन इतका येत आहे, मात्र तालुक्यातील इतर कारखान्यांनी दिलेला दर व फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेली मागणी याचा सकारात्मक विचार करून ही वाढीव दराची घोषणा करण्यात आली आहे. अजितराव जगताप यांनी स्पष्ट केले की मागील चार हंगामामध्ये श्री दत्त इंडिया साखर कारखाना शेतकऱ्यांच्या उसाला दर देण्यामध्ये कधीही कमी पडला नसून भविष्यात सुद्धा शेतकऱ्यांना अधिकाधिक दर देण्याचा कारखान्याचा प्रयत्न राहणार आहे.
यावेळी कारखान्याच्या व्हॉइस प्रेसिडेंट भारत तावरे, केन मॅनेजर सदानंद पाटील, शेतकी अधिकारी रमेश बागनवर, दिगंबर माने, टेक्निकल युनिट हेड अमोद पाल, अकाउंट जनरल मॅनेजर अमोल शिंदे, चीप इंजिनिअर अजित कदम, फलटण तालुका साखर कामगार सेक्रेटरी राजेंद्र भोसले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले पै संतोष भोसले गोरख, भोसले सुहास गायकवाड, पोपट भोसले, संजय जाधव उपस्थित होते. अजितराव जगताप यांनी फलटण तालुक्यासह तालुक्या बाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा संपूर्ण ऊस श्री दत्त इंडिया साखर कारखान्याला गाळपास देण्याचे आवाहन केले.
ही घोषणा शेतकऱ्यांसाठी एक सकारात्मक संकेत आहे कारण त्यामुळे त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळण्याची शक्यता वाढते. श्री दत्त इंडिया साखर कारखान्याच्या या निर्णयामुळे तालुक्यातील साखर उत्पादन क्षेत्रात चांगला प्रतिसाद मिळण्याची आशा आहे.