दैनिक स्थैर्य । दि. २९ मार्च २०२२ । फलटण । श्रमसंस्कार शिबीर श्रमदान व समाजसेवा यांची एक चळवळ आहे. खेडी स्वयंपूर्ण बनविण्यासाठी याची अत्यंत आवश्यकता असल्याचे स्पष्ट करीत या शिबीरातून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरचे नेतृत्व उदयास येणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन मसाप फलटण शाखा कार्याध्यक्ष प्रा.रविंद्र कोकरे यांनी केले. श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीर गुरुवार दि. २४ ते ३० मार्च दरम्यान जिल्हा परिषद प्रा. शाळा उपळवे, ता. फलटण येथे आयोजित करण्यात आले असून सदर शिबीर उदघाटन समारंभात विशेष अतिथी म्हणून प्रा. कोकरे बोलत होते. अध्यक्षस्थानी मसाप फलटण शाखा कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे होते. शाखाध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे यांच्या हस्ते शिबीराचे उदघाटन समारंभपूर्वक झाले. यावेळी सरपंच सौ. दिपाली धनाजी जगताप, उपसरपंच सौ. सुनंदा मल्हारी जाधव, पोलीस पाटील सौ. स्वाती प्रमोद डफळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रशेखर लंभाते, ग्रामसेवक मनोहर कोकाटे, लक्ष्मण अहिवळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील जगताप, प्रदीप लंभाते, श्रीकांत लंबाते आदी उपस्थित होते.
आपला समाज व आई – वडील यांची आपण बांधीलकी जपली पाहिजे. समाजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा सेवा हा एकमेव मार्ग असल्याचे स्पष्ट करीत प्रा. कोकरे यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले,भाषणात मनोरंजना बरोबरच सत्कार, सेवा, श्रम, देशभक्ती याविषयी अंजन घालण्याचे उत्तम काम त्यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये परिश्रम, स्वावलंबन, स्वयंशिस्त, राष्ट्रप्रेम, सेवाभाव सहकार्य भावना, सामाजिकता, एकात्मता, सलोखा, नेतृत्व, आत्मविश्वास या गुणांचा विकास केला जात असल्याचे सांगून प्रा. महादेव गुंजवटे यांनी अध्यक्षीय भाषणात या संदर्भातील काही बोधवाक्य सांगून विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
लोकसेवेतून शिक्षण व शिक्षणातून लोकसेवा हाच राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश आहे, राष्ट्रसेवा व समाजसेवा हेच त्याचे ध्येय आहे. खरे तर शिक्षक हे केवळ साधन असून चांगला समाज हे आपले साध्य आहे जे अशा शिबीरातून प्राप्त होत असल्याचे प्रा. महादेव गुंजवटे यांनी निदर्शनास आणून दिले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या इतिहासाबद्दल मौलिक मार्गदर्शन करीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाचे धडे देण्याचे काम सुरु असल्याचे गौरवोद्गार व्यक्त करीत प्रत्येक विद्यार्थ्याने त्यामध्ये आपले योगदान दिले पाहिजे अशी अपेक्षा प्राचार्य शांताराम आवटे यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय सेवा योजना हा एक स्तुत्य उपक्रम असून, आमच्या गावांमध्ये हा उपक्रम राबविल्याबद्दल धनाजी जगताप यांनी ग्रामस्थांच्यावतीने विशेष आभार व्यक्त केले. विद्यार्थी, शिक्षक व अन्य सर्व घटकांना ग्रामस्थांचे पूर्ण सहकार्य राहील याची ग्वाही देत गावामध्ये असे उपक्रम मार्गदर्शक असून त्याद्वारे गावाचा विकास साधण्यास मार्गदर्शन व मदत होईल अशी अपेक्षा धनाजी जगताप यांनी व्यक्त केली. सरस्वती पूजनानंतर कै. नामदेवराव सूर्यवंशी बेडके (नानांच्या) प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल्यानंतर दीपप्रज्वलन आणि श्रमदानाची साधने खोरे, फावडे, टिकाव, घमेले, खराटा यांची विधीवत पूजा करण्यात आली.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दीपक राऊत यांनी मान्यवरांचे सत्कार व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. सतेज दणाणे यांनी प्रस्ताविकात राष्ट्रीय सेवा योजना संकल्पना, शिबीर आवश्यकता व त्याचे उद्देश स्पष्ट केले. प्रा. ताराचंद्र आवळे, जिल्हा परिषद प्रा. शाळा मुख्याध्यापक इनामदार यांनी विद्यार्यांना प्रोत्साहन देऊन बहुमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सतेज दणाणे, आभार प्रा. दयानंद बोडके यांनी मानले.
कार्यक्रमास महाविद्यालय प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, उपळवे ग्रामस्थ, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक/स्वयंसेविका उपस्थित होत्या. शिबीर समारोप प्रसंगी शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. अभय जायभाये यांचे मार्गदर्शन लाभणार असून श्रीराम एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष सी. एल. पवार सर आणि नियामक मंडळ सदस्य महेंद्र सुर्यवंशी बेडके हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.