दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.८२८ व संघमित्रा महिला मंडळ, जुईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रामनेर संघाचे स्वागत, धम्मरॅली व धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन सरसेनानी आनंदराज आंबेडकर व कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनव बँक्वेट हॉल, राजीव गांधी ब्रिजजवळ, नेरुळ सेक्टर – २ येथे करण्यात आले होते. धम्मप्रचार व प्रसार या उदात्त हेतूने बौद्धजन पंचायत समितीद्वारे अनेक विधायक, प्रबोधनात्मक आणि शैक्षणिक कार्य नेहमीच होत असतात, त्याच शृंखलेतील पुढील पर्व म्हणून रविवार दि. २ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वा. पूज्य भदंत मेत्ताधम्मो महाथेरो (संघनायक) यांच्या नेतृत्वाखाली श्रामनेर संघाचे उत्सव चौक, सेक्टर २३ जुईनगर ते सेक्टर २ नेरुळ पर्यंत भव्य धम्मरॅलीचे आयोजन करण्यात आले, भदंत मेत्ताधम्मो महाथेरो (संघनायक) यांनी खुल्या जीपमध्ये बसून धम्मगाथा म्हणत शांततेत रॅलीला प्रारंभ केला त्यावेळी पुष्पवृष्टी करून सर्व संघास सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमास संस्कार समिती अध्यक्ष मंगेश पवार, चिटणीस मनोहर मोरे, विभाग प्रतिनिधी गोपाळ जाधव, बौद्धचार्य वि. सी. सोनावले, समाजसेवक मधुकर भदिंगे, युवा नेते जयेश मढवी, उद्योगपती कुणाल भोईर, मा. नगरसेवक रंगनाथ औटी, उद्योगपती जालिंदर औटी, विभागप्रमुख राजेश पोसम, शाखाप्रमुख मंगेश मोहिते, जेष्ठ नागरिक संघाचे अंकुश नलावडे, जिल्हाप्रमुख भगवान साळवी आदी मान्यवर जातीने उपस्थित होते. सदर प्रसंगी धम्मसेवा देण्यासाठी मंगेश पवार गुरुजी, अशोक कासारे गुरुजी, विजय कांबळे गुरुजी, नारायण जाधव गुरुजी, किशोर वळंजू गुरुजी, संतोष कदम गुरुजी, संदीप गमरे गुरुजी तसेच विभागातील उपासक उपासिका तसेच बौद्धजन पंचायत समिती, जुईनगर, भारतीय बौद्ध महासभा, जुईनगर, जेष्ठ नागरिक संघ, जुईनगर या संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी ११.३० वा अभिनंदन वातानुकूलित बँक्वेट हॉलमध्ये पूज्य भन्तेजींना बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ८२८ च्या वतीने भदंत मेत्ताधम्मो महाथेरो (संघनायक) व श्रामनेर संघास भोजनदान देण्यात आले, तद्नंतर प्रमूख अतिथी व मान्यवरांचा पुष्पसुमन देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुनील शिर्के यांनी भूषवले तर सूत्रसंचालनाची धुरा सिध्दार्थ साळवी यांनी पेलवली, स्वागत यशवन्त शिंदे, समीर साळवी, सूर्यकांत सावंत यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बळीराम कांबळे, श्रीसेन तांबे, शिवदास सकपाळ, बुद्धेश्वर दरेकर यांनी अथक परिश्रम घेतले. सरतेशेवटी धम्मगाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.