दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२२ । नागपूर । श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विधानसभा सदस्य अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवेळी झालेल्या चर्चेस उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिस करत आहेत. यापूर्वी श्रद्धाने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल पोलिसात तक्रार दिली होती. महिन्याभराने नंतर ती तक्रार मागे घेण्यात आली. याप्रकरणी कोणाचा दबाव होता का, याची विशेष पथकामार्फत चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्यात ४० हून अधिक मोर्चे निघाले. विविध मोठ्या १५ हून अधिक संघटनांनी त्यात सहभाग घेतला. आंतरधर्मीय विवाहाला कोणाचा विरोध नाही. मात्र, जाणीवपूर्वक एका षडयंत्राचा भाग म्हणून असे विवाह काही जिल्ह्यात होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यासंदर्भात काही राज्यांनी कायदे केले आहेत. या कायद्यांचा अभ्यास करून अधिक प्रभावी कायदा करण्याचा विचार करण्यात येईल. षडयंत्राचा भाग म्हणून कोणाची फसवणूक होऊ नये, हीच राज्य शासनाची भूमिका असल्याचे ते म्हणाले.
राज्यातील छेडछाड, अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शक्ती कायदा लागू करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. केंद्रीय कायद्याचा अधिक्षेप करून आपण तो कायदा करतोय त्यामुळे विविध विभागांचे म्हणणे त्यामध्ये विचारात घ्यावे लागते. यासंदर्भात राज्य शासन पाठपुरावा करत असल्याचीही माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.
लक्षवेधीवरील या चर्चेत विधानसभा सदस्य श्री. भातखळकर यांच्यासह सदस्य अबू आझमी, सुनील प्रभू, आशिष शेलार आदींनी सहभाग घेतला.