
स्थैर्य, सातारा, दि.११: कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या २ हजाराच्यावर कायम राहिली आहे. त्यामुळे या कोरोनाशी लढण्यासाठी कोव्हिड लस महत्वपूर्ण ठरत आहे. पण गेल्या दहा अकरा दिवसांत ही लस एखादा दुसरा अपवाद वगळता पूर्णत: ब्रेकच लागला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३२ लाख आणि येणारी लस ही हजारात त्यामुळे कोव्हिड लसीची ही सर्वत्र बोंबाबोंबच दिसून येत आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात ५ लाख ४३ हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. मात्र, आता दुसऱ्या लसीच्या डोससाठी हे सर्वचजण प्रतिक्षेत आहेत. पण याबाबत आरोग्य विभागाचे कोणतेही वेळापत्रक नाही. लस केव्हा येणार अन किती येणार याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर ही लस येईल की नाही किंवा किती दिली जाणार याबाबत कोणत्याही सूचना नाहीत. जेव्हा पाठविण्याचे नियोजन होते. त्यावेळी अनपेक्षीत सांगितले जाते.
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ६0 वर्षावरील ज्येष्ठ आणि ४५ ते ४९ वयोगटातील कोमॉर्बिड नागरिकांना कोव्हिडची लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षावरील सर्वांनाच ही लस मिळू लागली. त्यासाठी खासगी आणि शासकीय आरोग्य केंद्रात ही सुविधा सुरु झाली. यामध्ये शासकीय केंद्रात मोफत देण्यात आली. १ मे पासून कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय झाला पण अगोदरच ४५ वर्षावरील लाभार्थी जवळपास नऊ लाख आहेत. अन या दुसऱ्या लसीचा डोस पूर्ण नसताना शासनाने १८ ते ४४ वयोगटासाठी दिलेला निर्णय म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार आहे. मंगळवारी कोव्हिीशिल्ड किंवा कोव्हॅक्सीन ही लस सातारा जिल्ह्याला येईल की नाही याबाबत अजूनही निश्चित माहिती नाही. त्यामुळे दुसऱ्या डोसबाबत अनेक नागरिक गेल्या पंधरा दिवसांपासून प्रतिक्षेतच दिसून येत आहेत. एकूणच कोव्हिड लसीबाबत जिल्हा प्रशासनही आता हतबल झाल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
सध्या जिल्ह्यात ४00 लसीकरण केंद्र आहेत. यामध्ये रोटेशनप्रमाणे ही लस दिली जाते पण येणाऱ्या लसीचा विचार करता अनेक लसीकरण केंद्र ही बंदच ठेवण्यात आली आहेत. आतापर्यंत ६ लाख ८४ हजार ५0 डोस आले आहेत. त्यापैकी ६ लाख ३१ हजार१७ जणांचे लसीकरण झाले. यामध्ये ५ लाख ४३ हजार १८४ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस ८७ हजार ८३३ जणांना देण्यात आला आहे. सोमवारी जी कोव्हिीशिल्ड आणि कोव्हॅक्सीन लस आली ती ही तोकडीच होती. त्यामुळे याबाबतची जी आकडेवारी आहे. ती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही.