स्थैर्य, सातारा, दि.१२: जिल्ह्यातील कोरोना संसर्गापाठोपाठ म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढले आहे. तब्बल 15 बाधितांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांना अत्यावश्यक असणारे अॅम्फोटेरिसीन बी इंजेक्शनचा तुटवडा जिल्ह्यात असून रुग्णांना इंजेक्शन मिळत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे या इंजेक्शनचा काळाबाजार फोफावला असून एक इंजेक्शन 12-15 हजार रुपये किंमतीने त्यांची विक्री केली जात आहे. कोरोना महामारीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार झाला होता. त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांचा पर्दाफाश केला. सध्या म्युकर लागणारे अॅम्फोटेरिसीन बी. इंजेक्शन मिळवून देणारी टोळी सक्रिय झाली आहे. ज्या जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण कमी आहेत येथून ही खरेदी करत आहेत. त्यांच्यामार्फत एका इंजेक्शनची 12 ते 15 हजार रुपये किमतीने विक्री सुरू आहे. अॅम्फोटेरिसीन बी इंजेक्शनच्या एका व्हाईलची कंपनीची मूळ किंमत 1,500 ते 5,000 रुपयांपर्यंत आह. अॅम्फोटेरिसीन बी इंजेक्शनचा काळा बाजार होऊ नये म्हणून जिल्हा शासकीय औषध भांडारगृहातून त्यांचे वितरण संबंधित रुग्णालयांना केले जाते. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेद्वारे रुग्णांवर म्युकर मायकोसिसवर मोफत उपचारांची सोय उपलब्ध केली आहे. जिल्हा रुग्णालय, सह्याद्री कराड, कृष्णा कराडसह खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत म्युकर मायकोसिसचे एकूण 95 रुग्ण आढळले आहेत. 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 16 जणांनी या आजारावर मात केली आहे. दिवसेंदिवस या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जिल्हा रुग्णालयातील म्युकर मायकोसिस वॉर्ड रुग्णांनी भरला आहे. तर रुग्ण वाढू लागल्याने जम्बो कोविड सेंटरमध्ये 40 बेडचा कक्ष स्थापन करण्यात आला. आज अखेर 750 इंजेक्शन्स जिल्ह्यास प्राप्त झाली आहेत.