स्थैर्य, फलटण, दि. २७ : दिवसेंदिवस रक्ताच्या मागणीत वाढ होत असतानाच त्याच्या तुलनेत रक्तदात्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे रक्ताची आवश्यकता भासल्यास रुग्णाच्या नातेवाइकांना धावाधाव करावी लागते. रक्ताचा तुटवडा लक्षात घेता, आपण स्वतः किंवा आपल्या मित्र परिवारास रक्त दानासाठी उद्युक्त करावे. म्हणजे ब्लड बँक जरुरी च्या वेळी रुग्णांना रक्तपुरवठा करू शकेल. असे आवाहन करुन सहकार्याची अपेक्षा डॉ. बिपिन शहा, डॉ. श्रीकांत करवा, डॉ. संतोष गांधी व डॉ. दत्तात्रय देशपांडे यांनी केले आहे.
लॉकडाउनचा कालावधी वाढल्यामुळे रक्तसंकलनाचे प्रमाणही कमी झाले असून येत्या काळामध्ये पुन्हा रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रक्ताचे विविध प्रकारचे आजार असलेल्यांना किंवा प्रसूती वा इतर अत्यावश्यक शस्त्रक्रियांची गरज असलेल्यांसाठी रक्ताची उपलब्धता कशी करायची, हा प्रश्न आता रक्तपेढ्यांपुढे निर्माण झाला आहे. लॉकडाउनचा कालावधी वाढेल याची कल्पना नसल्याने राज्यातील रक्तपेढ्यांनी तेवढ्याच कालावधीसाठी रक्ताचे नियोजन केले होते. रक्त हे एका ठराविक कालमर्यादेपलीकडे साठवून ठेवता येत नाही. यामुळेच संभाव्य परिस्थिती लक्षात घेता फलटण ब्लड बँकेने रक्तदात्यांना रक्तदानाचे आवाहन केले असून त्यास प्रतिसाद देऊन सहकार्य करावे असे म्हटले आहे.