
दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२२ । मुंबई । शॉपिफाय इंकया वाणिज्यासाठी अत्यावश्यक इंटरनेट संरचना पुरवणाऱ्या कंपनीने पेओनीअर, पेग्लोकल व ताजापे या भारतातील व्यापाऱ्यांसाठीच्या आघाडीच्या आंतरसीमा पेमेंट पुरवठादार कंपन्यांशी भागीदारी केल्याचे आज जाहीर केले.
शॉपिफायवरील भारतीय व्यापाऱ्यांसाठी आंतरसीमा वाणिज्य सुलभ करून देण्याच्या उद्देशाने या नवीन पेमेंट भागीदारांची भर घालण्यात आली आहे, शॉपिफायवरील सुमारे ५ व्यापाऱ्यांपैकी १ व्यापारी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री करत आहे आणि ही विक्री सरासरी चार आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये होत आहे, अशा रितीने भारतीय व्यापारी जगातील ७० दशलक्षांहून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचत आहे. व्यापाऱ्यांना विनाकटकट प्रक्रियांसह तसेच कमी व्यवहार शुल्कामध्ये पेमेंट प्राप्त करण्याची क्षमता देऊन आंतरसीमा व्यवसायाला बढावा देण्यावर शॉपिफाय सातत्याने भर देत असून, या भागीदारी याच उद्देशाने करण्यात आल्या आहेत.
पेओनीअर, पेग्लोकल व ताजापे यांच्याशी झालेल्या भागीदारीमुळे प्लॅटफॉर्मवर ८०हून अधिक नवीन पेमेंट पद्धतींची भर पडणार आहे, रूपांतरण अधिक भक्कम होणार आहे, व्यवहार शुल्क कमी होणार आहे आणि आंतरराष्ट्रीय पेमेंट्सची स्वीकृती अधिक व्यापक होणार आहे.
शॉपिफायमधील संचालक व इंडिया कंट्री हेड भारती बालाकृष्णन म्हणाल्या “व्यापाऱ्यांना विनासायास जागतिक स्तरावर जायचे असेल, तर खात्रीशीर पेमेंट्स हा महत्त्वाचा घटक आहे. शॉपिफाय इंडियाच्या व्यापाऱ्यांसाठी आंतरसीमा व्यवहार व्यवसायाचा अमूल्य भाग असल्यामुळे आम्ही पेओनीअर, पेग्लोकर व ताजापे यांच्याशी सहयोग केला आहे. आंतरराष्ट्रीय पेमेंट्स अखंडित व अधिक किफायतशीर करणे हाच यामागील उद्देश आहे. “आमच्या भागीदारींमुळे आमच्या व्यापाऱ्यांना अनेकविध लाभ मिळतात. जलद गतीने सेटलमेंट होणे, अधिक चांगले चार्जबॅक संरक्षण, फसवणूक करणारे व्यवहार रोखण्यासाठी स्थानिक जोखीम यंत्रणा व अतिरिक्त स्थानिक सहाय्य असे अनेक लाभ व्यापाऱ्यांना मिळतात.”