स्थैर्य, सातारा, दि.२० : कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता
असल्याचे तज्ञ सांगत आहेत. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्ह्यात धडक
मोहीम पोलीस, नगरपरिषद आणि विविध विभागांमार्फत राबविण्यात येणार आहे.
मोहिमेंतर्गत जे नागरिक, दुकानदार शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे
पालन करणार नाहीत, अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
काही
दुकानांमध्ये आजही गर्दी दिसत असून सुरक्षित अंतराचे पालन केले जात नाही,
अशी दुकाने 7 दिवस बंद करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
दुकानदारांनी आपल्या दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच
मास्क असल्यासच ग्राहकांना दुकानात प्रवेश देण्यात यावा, तसेच दुकानात
सुरक्षित अंतराचे पालन होईल याची देखील खबरदारी घ्यावी. कोरोना बाधितांच्या
संसर्गात आलेले नागरिक तपासणी करण्यास विरोध करत आहेत. खरबदारीचे उपाय
म्हणून आरोग्य विभागाची टीम तपासणीसाठी आल्यास त्यांना विरोध करु नये.
संसर्ग पसरु नये म्हणून जिल्हा प्रशासन योग्य ती खरबदारी घेत आहे.
यापूर्वी नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य केले
त्याचप्रमाणे सहकार्य करावे. कोरोना बाधित रुग्ण जिल्ह्यात कमी आढळत असले
तरी कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेला नाही. कुणीही गैरसमजुतीमध्ये राहू नये.
लस यायला आणखीन काही महिने लागतील. लस आली तरी ती प्रत्येक नागरिकांपर्यंत
पोहचण्यासही वेळ लागेल. प्रत्येक नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व
हाताची स्वच्छता वारंवार केली पाहिजे. कुणी बाधितांच्या संपर्कात आल्यास
त्यांनी तत्काळ आपली टेस्ट करुन घ्यावी, तसेच आरोग्य यंत्रणा घरी आल्यास
त्यांना सहकार्य करावे. आपल्याबरोबर आपल्या आजूबाजूच्या वयोवृद्धांचीही
काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.