स्थैर्य, पुणे, दि. १४: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. यामध्ये विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत आहे. यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेत संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सावध प्रतिक्रिया दिली आहे. मात्र या प्रकरणी आता वेगळाच खुलासा समोर आला असून या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली, असा जबाब पूजासोबत असलेल्या दोघांनी दिल्याची माहिती मिळत आहे. इतकच नाही तर रुममध्ये वाईनच्या बाटल्याही सापडल्याची माहिती मिळत आहे. वानवडी पोलिसांनी अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांचा जबाब नोंदवला आहे. यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याचे शक्यता व्यक्त होत आहे.
पूजा चव्हाणच्या आई-वडिलांचा जबाबत पोलिसांनी यापूर्वीच नोंदवला आहे. या घटनेचा उलगडा होण्यापर्यंत तपास सुरु राहणार आहे. पोलीस महासंचालकांनी पुणे पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिल्याची माहिती मिळते. पण पोलीस मात्र याबाबत अधिकृतपणे बोलत नाहीत. दरम्यान आज उशिरापर्यंत पोलीस महासंचालकांना चौकशी अहवाल सादर केला जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. तसेच चौकशी झाल्यावरच सत्य समोर येईल, अशी भूमिका महाविकास आघाडीतील नेत्यांनी घेतली आहे.