संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना काळे फासल्याचा धक्कादायक प्रकार

संदीप जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतले


स्थैर्य, 3 जानेवारी, स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत (सातारा) :  मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना काळे फासल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि.३) घडला आहे. माझ्यावर हल्ला करणाऱ्याच्या हातात कोयत्यासारखी शस्त्रं होती, असा गंभीर आरोप विनोद कुलकर्णीनी बोलताना केला. हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव संदीप जाधव असे असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.विनोद कुलकर्णी यांच्यावर काळे फासण्याचा हल्ला करताना हा जाधव मोठ्यामोठ्याने जनगणमन हे राष्ट्रगीत ही तोंडाने म्हणत होता .यावेळी आजूबाजूला उभे असलेल्या साहित्यिक, लेखक तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र दिसून आले
तुला संपवतो असे म्हणत चेहऱ्यावर फेकला काळा पदार्थ
विनोद कुलकर्णी यांनीबोलताना सांगितले की, “मी साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशन कार्यक्रम करून कार्यक्रमस्थळावरून बाहेर पडत होतो. यावेळी अज्ञात व्यक्तीने माझ्या डोळ्यात काळा पदार्थ टाकला. त्यांच्याकडे कोयत्यासारखी शस्त्रही होती. तुला संपवतो अशी भाषाही यावेळी हल्लेखोराने वापरली. यावेळी काळा काही तरी डोळ्यात गेल्याने मला काहीही दिसले नाही. उपचार घेऊन मी पुन्हा संमेलनस्थळी दाखल झालो आहे.” “मी सरकारविरोधात, हिंदी सक्तीविरोधात भूमिका घेतली आहे. संमेलन होऊ देणार नाही अशा धमक्याही अनेक जणांनी दिले होत्या परंतु मराठी भाषेसाठी आम्ही झटत आहोत आणि भले 72 माझे प्राण गेले तरी मी हा लढा सुरूच ठेवणार आहे आमच्या सरकार व वेगवेगळ्या संघटनांविरोधात मराठी भाषेसाठी लढाया सुरू आहेत. कोणत्या कारणातून माझ्यावर हल्ला झाला हे मला समजून आलेले नाही,” असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
विचाराची लढाई विचाराने केली तरच ते योग्य आहे आज मी माझ्या मित्रासोबत प्रकाशन समारंभ आटोपून स्टेजवरून खाली उतरत असताना हा प्रकार घडला आहे हल्ला केला की कोणी करायला लावला आहे हे माहिती नाही. पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करून मला न्याय देतील, असा विश्वासही कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
सातारा जिल्ह्यात संतापाची लाट
 अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष आणि पत्रकार संघटनेचे मार्गदर्शक विनोद कुलकर्णी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सातारा जिल्ह्यातील पत्रकार संघटनांच्या वतीने तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड या सर्वांनीही आज घडलेल्या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “विचाराची लढाई ही विचारानेच लढली गेली पाहिजे, हिंसेचा मार्ग अवलंबणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे,” अशा भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आल्या. साहित्य संमेलन इतक्या चांगल्या रीतीने सुरू असताना त्यात असे प्रकार घडवून त्याला गालबोट लावण्याचे प्रकार चांगले नाहीत अशी भावना मंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केली. प्रा. मिलिंद जोशी आणि विश्वास पाटील यांनी घडलेल्या प्रकाराचा निषेध करून सर्वजण विनोद कुलकर्णी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे स्पष्ट केले.
भ्याड हल्ल्याचा पत्रकारांकडून निषेध
या घटनेने जिल्ह्यातील पत्रकार आणि साहित्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, सातारा पत्रकार अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे आणि ज्येष्ठ पत्रकार सुजित आंबेकर यांनी या हल्ल्याचा कडाडून निषेध केला आहे. पोलिसांनी या संपूर्ण घटनेची गांभीर्याने दखल घेऊन हल्लेखोरांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना योग्य शासन घडवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पत्रकार संघटनांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे पत्रकारिता क्षेत्राचा आवाज दाबता येणार नाही. यापुढे विनोद कुलकर्णी यांच्या केसालाही धक्का लागला, तर संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकार संघटना केवळ निषेध नोंदवून थांबणार नाहीत, तर या अन्यायाविरुद्ध कृतीतून सडेतोड उत्तर दिले जाईल. या घटनेचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून सूत्रधारांना जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे.


Back to top button
Don`t copy text!