दैनिक स्थैर्य । दि.०८ एप्रिल २०२२ । सातारा । छत्रपती शाहू क्रीडा संकुलमध्ये तिसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात माती गटात झालेल्या लढतीती धक्कादायक निकाल लागले. यामध्ये सोलापूरचा महाराष्ट्र केसरी बाला रफी याला पराभवाचा धक्का बसला. एकतर्फी झालेल्या लढतीत पैलवान विशाल बनकर मुंबई याने 13-3 अशा गुणांनी मात केली. तर गादी गटात गतवर्षीच्या विजेत्या महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर नाशिक विरुद्ध कोल्हापूरच्या संग्राम पाटील हा 8 विरुद्ध सात अशा गुणाधिकक्याने मात केली.
विजांचा कडकडाट, अन प्रेक्षकांचा जल्लोष यामध्ये पंचाना निकाल नोंदवताना अडचणी येत होत्या. यामुळे संयोजकांना प्रेक्षकांच्या उत्साहाला आवरते घालणे कठीण झाले.
गुरुवारी माती अन गादी विभागात झालेल्या लढतीत बऱ्याच पैलवानांचा दमासास लागला. एकलांगी कुंडीत, घुटना पट अशा विविध डावाचे चित्त थरारक दर्शन प्रेक्षकांना झाले. कुस्ती निकाली काढण्यासाठी लागणारे कसब मल्ल दाखवत होते पण बऱ्याच कुस्त्या तांत्रिक निकालावर काढाव्या लागल्या . दरम्यान पैलवानांना उष्म्यामुळे लवकर थकवा येत असल्याचे दिसून आले.87, 92 आणि 125 य तीन खुल्या वजनी गटात उपांत्य फेरी रात्री उशिरा रंगल्या.
धक्कादायक निकाल –
सिकंदर शेख वाशीम विरुद्ध विलास डोईफोडे जालना या कुस्तीत सिकंदर शेख दहा शून्यने विजयी म्हणजे एकतर्फी झाली.
कौतुक ढाफळे विरुद्ध अनिल जाधव या कुस्तीत अनिल जाधव चितपटीने विजयी.
विशाल बनकर मुंबई विरुद्ध महाराष्ट्र केसरी बाला रफी शेख या कुस्तीत विशाल बनकर तेरा तिनने विजयी. पहिल्या फेरीत तीन पाच ने विशाल बनकर आघाडीवर त्यानंतर विशाल बनकर याने लागोपाठ दुहेरी पट काढून सहा धावांची कमाई केली अन 13 शून्य ने कुस्ती जिंकली.
हर्षवर्धन कोकाटे पुणे विरुद्ध गणेश जगताप या कुस्तीत हर्षवर्धन कोकाटे विजयी. हर्षवर्धन कोकाटे याने दुहेरी पट तसेच भारणदाज मारून गुणांची कमाई करून विजयी झाला.
भारत मदने मुंबई विरुद्ध विक्रम पारखी यामध्ये भारत मदने याने दुहेरी पट काढून चितपटीने विजयी
गादी विभाग हर्षवर्धन सदगीर नाशिक विरुद्ध संग्राम पाटील कोल्हापूर यामध्ये हर्षवर्धन सदगीर गुणाधिकक्याने विजयी.
हर्षद कोकाटे पुणे विरुद्ध अक्षय मदने ठाणे सहा एकने हर्षद कोकाटे विजयी.
अक्षय शिंदे बीड विरुद्ध मेघराज शिंदे या कुस्तीत अक्षय शिंदे दहा शून्यने विजयी.
पृथ्वीराज पाटील कोल्हापूर विरुद्ध सुदर्शन कोतकर दहा चार ने विजयी.
तिसऱ्या दिवशी झालेल्या ६१ किलो गादी विभागातील अंतिम फेरीत कोल्हापूर जिल्ह्याचा आंतरराष्ट्रीय युवा खेळाडू विजय पाटील याने सोलापूर जिल्ह्याच्या तुषार देशमुख यांचा अत्यंत चुरशीच्या लढतीत ८-७ अशा गुणाधिक्याने पराभव करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले तर तुषारला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीत विजय पाटील याने पुणे जिल्ह्याच्या आबा शेडगे याचा ८-२ अशा गुण फरकाने पराभव करून अंतिम फेरीत सहज प्रवेश केला होता. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत तुषार देशमुख याने साताऱ्याच्या विशाल सुळ याचा ४-१ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती.
याच गटात कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत पुणे जिल्ह्याच्या आबा शेडगे याने अमरावतीच्या गोविंद कापडे याचा १२-० अशा मोठ्या गुण फरकाने पराभव करून कांस्यपदक पटकावले. तसेच साताऱ्याच्या विशाल सुळ याने जळगावच्या करण परदेशी याचा १२-२ अशा गुणाधिक्याने पराभव करून कांस्यपदक जिंकले.
८५ किलो गादी विभागातील अंतिम फेरीमध्ये नाशिक जिल्ह्याच्या बाळू बोडके याने अहमदनगरच्या ॠषिकेश लांडे याचा १०-० अशा मोठ्या गुणाधिक्याने एकतर्फी पराभव करून सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. तर ॠषिकेशला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
८६ किलो गादी विभागातील उपांत्य फेरीत अहमदनगरच्या ॠषिकेश लांडे याने कोल्हापूर जिल्ह्याच्या किरण पाटील याचा ६-२ अशा गुणाधिक्याने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत नाशिक जिल्ह्याच्या बाळू बोडके याने पुणे शहरच्या अभिजित भोईर याचा ८-२ अशा गुण फरकाने पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती. या गटातील कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत कोल्हापूर जिल्ह्याच्या किरण पाटील याने साताऱ्याच्या विशाल राजणे याचा ५-२ अशा गुणाधिक्याने पराभव करून कांस्यपदक पटकावले. तर दुसऱ्या कांस्य पदकासाठी पुणे शहरच्या अभिजित भोईर व पुणे जिल्ह्याच्या प्रतिक जगताप यांच्यात झाली. या अत्यंत चुरशीच्या लढतीत निर्धारित वेळेत दोन्ही कुस्तीगीरांचे समान गुण झाले होते. मात्र नियमांनुसार अभिजित भोईर याने उच्च कलात्मक गावांच्या गुणांच्या जोरावर प्रतिक जगताप याचा पराभव करून कांस्यपदक पटकावले.