दैनिक स्थैर्य । दि.१० जानेवारी २०२२ । सातारा । पोवई नाका येथील छ. शिवाजी महाराज पुतळा परिसर अर्थात शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाचे काम निधी अभावी रखडले आहे. यासंदर्भात शिवप्रेमी आणि नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. तातडीने निधी उपलब्ध करून हे काम मार्गी लावा, अशी आग्रही मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. त्यास पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून शिवतीर्थ सुशोभीकरणाच्या कामासाठी ३ कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय डीपीडीसीच्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पोवई नाक्यावरील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचा मुद्दा मांडला. निधी नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाचे काम रखडले आहे. यामुळे शिवप्रेमी आणि नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐतिहासिक शिवतिर्थाचे रखडलेले काम मार्गी लावणे आवश्यक असून कोठूनही निधी उपलब्ध करून द्या आणि शिवतीर्थ सुशोभीकरणाचे काम त्वरित मार्गी लावा, असे आ. शिवेंद्रसिंहराजे बैठकीत म्हणाले. बैठकीस उपस्थित सर्वच सदस्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांची मागणी उचलून धरली आणि निधीची मागणी पालकमंत्र्यांकडे केली. दरम्यान, शिवतीर्थाच्या देखभाल दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेला जमत नसेल तर जिल्हा परिषदेकडून हा संपूर्ण परिसर सातारा नगर पालिकेकडे हस्तांतरीत करावा, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे बैठकीत म्हणाले.
यानंतर पालकमंत्री ना. पाटील यांनी शिवतीर्थ सुशोभीकरणाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी ३ कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला. यामुळे लवकरच शिवतीर्थ सुशोभीकरणाचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, ऐतिहासिक गोडोली तळे सुशोभीकरणाचा प्रस्ताव तयार करून राज्याच्या पर्यटन विभागाकडे पाठवावा, अशी सूचनाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत केली. यांसंदर्भातही ना. पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.