दैनिक स्थैर्य | दि. ३१ जानेवारी २०२५ | फलटण | सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फलटण तालुका अध्यक्ष पदी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांची नियुक्ती झाल्यानंतर, फलटण तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे, युवा नेते नंदकुमार नाळे, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विकास राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सातारा विभागीय कार्यालयात आयोजित केलेल्या समारंभात, राज्यसभा खासदार नितीन (काका) पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश समारंभ पार पडला. या समारंभात खासदार नितीन पाटील, आमदार सचिन कांबळे पाटील, जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांच्यासहित अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असून त्यांच्या पक्षातील योगदानामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने फलटण तालुका अध्यक्ष पदी नियुक्त केले आहे. या नियुक्तीमुळे फलटण तालुक्यात राजकीय वातावरणात सकारात्मक बदल होण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
फलटण पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे, युवा नेते नंदकुमार नाळे, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विकास राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकत वाढणार आहे. या नवीन प्रवेशित नेत्यांचे स्वागत करून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आगामी काळामध्ये फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद नक्की वाढणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी काळामध्ये अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुद्धा सुरु आहेत.