दैनिक स्थैर्य | दि. 13 ऑगस्ट 2024 | फलटण | विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये कार्यरत असणाऱ्या फलटण तालुक्यातील राजे गट फोडण्यासाठी आता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. राजे गटामधील दिग्गज व नाराज कार्यकर्त्यांना श्रीमंत शिवरूपराजे हे माजी खासदार रणजितसिंह यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी आणत आहेत.
नुकताच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश मुंबई येथे संपन्न झाला आहे. आता यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी महानंद डेअरीचे माजी उपाध्यक्ष डी. के. पवार यांच्यासोबत सुद्धा मुंबई येथे बैठक झाली असल्याची छायाचित्रे समोर आली आहेत. राजे गटातील दिग्गज कार्यकर्त्यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत आणण्यामध्ये श्रीमंत शिवरूपराजे हे अग्रभागी असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर माजी खासदार रणजितसिंह यांनी फलटण तालुक्यामध्ये चांगलेच लक्ष घातले असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पायाला भिंगरी लावून पळत आहेत. यासोबतच फलटण तालुक्यात जोरदार पक्ष बांधणी करत आहेत.
रणजितसिंह यांचा कार्यकर्त्यांना सशक्त बळ
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आपल्या सोबत काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांना नुसताच पाठिंबा किंवा इतर कोणत्याही बाबींचा विचार न करता सशक्त बळ देत आहेत. अगदी तळागाळातील कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या राज्य पातळीवरील नेत्यांच्या पर्यंत ओळख निर्माण करून देत आहेत. यामुळे कार्यकर्त्यांना नक्कीच सशक्त बळ मिळत असल्याच्या चर्चा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू आहेत.
आसुची ती सभा कारणीभूत
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी आसू येथे जाऊन जाहीर सभा घेतली होती. यामध्ये त्यांनी श्रीमंत शिवरूपराजे यांच्यावर कडाडून टीका केली होती; त्यामुळे श्रीमंत शिवरूपराजे हे आता राजे गटाच्या विरोधात ॲक्टिव्ह झाले असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.